कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमा

0
89

कोल्हापूर : जिल्हा बँकेने विकास सेवा संस्थांच्या १८ ते ८५ वर्षांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार सभासद शेतकऱ्यांना अपघाती मृत्यूपोटी दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरला आहे.

विमा हप्त्याची एक कोटी, १९ लाखांची सर्वच रक्कम जिल्हा बँकेने भरल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

लवकरच निविदा मागवून जिल्हा बँकेकडे पगाराची खाती असलेल्या नोकरदारांसाठी ३० लाख रुपयांच्या सामूहिक अपघाती विमा सुरक्षेची योजना आणण्याचा निर्णयही बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश विमा योजनेत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २ लाख ८५ हजार ८८० कर्जदार शेतकऱ्यांना विमा कवच लाभले आहे.

या वेळी बँकेचे संचालक आमदार सतेज पाटील, निवेदिता माने, भय्या माने, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here