पाऊस गेला…जीव टांगणीला; शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले

0
60

कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील

कोल्हापूर : गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रोज उठले की पांढरे शुभ्र आकाश दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. पिकांना मारक तर किडींना पोषक वातावरण असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

यंदा वरुणराजाच्या मनात काय आहे, हेच कळेना झाले. जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या होऊ शकल्या. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उघडझाप राहिल्याने पिकांची वाढ सुरू झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

विशेषत: माळरानावरील भुईमूग, भात, नागली ही पिके धोक्यात आली आहेत. नदी व विहिरीवरील विद्युत पंपाची वीज सोडवलेली आहे. त्यामुळे जिथे पाण्याची सोय आहे; पण वीज नसल्याने विद्युत पंप सुरू करता येईनात. गेल्या वर्षी २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १०४१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा तो ७९९ मिलिमीटरवरच थांबला आहे.

जिल्ह्यात ९६ टक्के पेरण्या

जून महिना कोरडा गेल्याने जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. जिल्ह्याचे १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर पेरक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा १ लाख ८६ हजार १६७ हेक्टर (९६.७६ टक्के) पेरणी झालेली आहे.

ओढे-नाले आटले

यंदा जुलै महिन्यात ओढ्या-नाल्यांना पाणी आले; मात्र पावसाने दडी मारल्यानंतर त्यातील पाणीही आटले आहे. ओढ्या-नाल्यांतील पाणी माळरानावरील पिकांना आधार असतो. यातच पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आकाशाकडे बघण्यापलीकडे काहीच नाही.

तांबेरा’, ‘करपा’ किडीचा प्रादुर्भाव

किडीला पोषक असेच सध्या वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग पिकांवर ‘तांबेरा’, ‘करपा’ या किडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवू लागला आहे. उसावरही लोकरी माव्याचे संकट आले आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाहीतर हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता धूसरच

एकूणच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी आठवडाभर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता धूसर आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, मात्र शेतीला अपेक्षित पाऊस पडणार नाही.

ऑगस्टमध्ये अंगातून घामाच्या धारा

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचा पारा ३२ डिग्रीपर्यंत पाेहोचला आहे. दुपारी तर अंग भाजून निघत आहे. ऑक्टोबरची हिट जाणवू लागली असून, त्यामुळे अंगाकतून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत २२ ऑगस्टपर्यंतचे पर्जन्यमान मिलिमीटरमध्ये
तालुका २२ ऑगस्ट २०२२ २२ ऑगस्ट २०२३
हातकणंगले ४२९ ३२१
शिरोळ २६८ २६०
पन्हाळा ११०२ ८२९
शाहूवाडी १६५७ ११४४
राधानगरी १५५१ १०५२
गगनबावडा ३१४५ २७२५
करवीर ७८४ ५८३
कागल ७५४ ५६१
गडहिंग्लज ६४३ ४६२
भुदरगड १५७७ १३७८
आजरा १३०१ १०७२
चंदगड १५०५ ११९६

जुलै महिन्यातील पंधरा-वीस दिवसांतील पाऊस वगळता सरासरीच्या कमी पाऊस आहे. एल निनोच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. – राहुल पाटील (मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here