खिडकीतून बाहेर टाकली कागदपत्रे, कर्मचाऱ्यांच्या बँक लॉकर्समध्ये ठेवलेली रोकड

0
64

नाशिकमध्ये सरकारी कंत्राटदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यात बेहिशोबी व्यवहाराची रक्कम ११०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचं समोर आलं आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच दिवस टाकलेल्या छाप्यात कागदपत्रे, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह जप्त केले आहेत.

कंत्राटदारांच्या बँक लॉकरमध्ये ९ कोटींची रोकड आणि ३ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ३१ जानेवारी रोजी शहरात एकाच वेळी ८ सरकारी कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले.

या छाप्यामध्ये बेहिशोबी आढळलेली रोकड सरकार जमा करण्यात आलीय. त्याची पावती आयकर विभागाला मिळाली आहे. ही रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन आयकर विभागाला वापरावे लागले.

आयकर विभागाने याआधीही एका कंत्राटदाराच्या घरासह कार्यालयावर छापा टाकला होता. त्यामुळे तो कंत्राटदार सावध होता आणि त्याने आपली काही कागदपत्रे, रोख रक्कम ही नातेवाईकांसह विश्वासू लोकांकडे ठेवली होती.

पण आयकर अधिकाऱ्यांनी त्या लोकांच्या घरातून कागदपत्रे आणि रोकड जप्त केलीय. एका कंत्राटदाराने आयकर अधिकारी येताच खिडकीतून बाहेर कागदपत्रांची फाइल टाकून दिली. तर काहींनी कार आणि घराच्या छतामध्ये कागदपत्रे, रोकड लपवली होती.

आयकर विभागाने छापा टाकला तेव्हा पहिल्या दिवशी फारशी माहिती किंवा कागदपत्रे अधिकाऱ्यांना हाती लागले नव्हते. पण दुसऱ्या दिवशी इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात रोकड आणि कागदपत्रे मिळाली. कंत्राटदारांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लॉकर्समध्ये पैसे ठेवले होते. त्या लॉकर्सचीही तपासणी केल्यानंतर मोठे घबाड हाती लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here