सराफ कामगारानेच रचला कट; सीमंधर ज्वेलर्समध्ये भरदिवसा झालेल्या चोरीचा कोल्हापूर पोलिसांनी लावला छडा

0
35

कोल्हापूर : वर्दळीच्या भाऊसिंगजी रोडवरील सीमंधर ज्वेलर्समध्ये २५ जानेवारीला भर दुपारी झालेल्या चोरीचा उलगडा करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली. भोर (जि. पुणे) येथून पिंटू जयसिंग राठोड (वय २५) आणि पूनमसिंग आसूसिंग देवरा (वय २१, दोघेही रा.

नून, पो. फुंगणी, जि. सिरोही, राजस्थान) यांना जेरबंद केले.

चोरीचा सूत्रधार केतनकुमार गणेशराम परमार (वय २३, रा. नून, पो. फुंगणी, जि. सिरोही) याला उत्तरेश्वर पेठ येथून अटक केली. परमार हा भेंडे गल्ली येथील एका सराफाकडे काम करीत होता. तिन्ही संशयितांकडून चोरीतील २२४ ग्रॅम सोने, ६२ हजारांची रोकड आणि मोबाइल असा १५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमंधर ज्वेलर्समधील चोरीचा तपास सहा पथकांकडून सुरू होता. शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संशयित चोरटे पुण्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. गुजरीत राजस्थान आणि बंगाल येथील कामगारांची संख्या जास्त आहे. यावरून माहिती काढली असता, ही चोरी राजस्थानातील काही चोरट्यांनी केल्याचे समजले.

फोन कॉल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या चौकशीतून पोलिसांना ठोस माहिती मिळाली. त्यानुसार भोर येथील एका लॉजमधून पोलिसांनी पिंटू राठोड आणि पूनमसिंग देवरा या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत केतनकुमार परमार याने चोरीचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. अटकेतील तिन्ही संशयितांचा ताबा जुना राजवाडा पोलिसांकडे देण्यात आला.

तपास पथकाचे कौतुक

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. निरीक्षक कळमकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, संजय कुंभार, प्रकाश पाटील, अमित सर्जे, विनोद चौगले, सतीश जंगम, आदींच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

बनावट चाव्याने केला कावा..

केतनकुमार परमार हा भेंडे गल्ली येथील एका सराफ दुकानात काम करीत होता. कामाच्या निमित्ताने सीमंधर ज्वेलर्समध्ये त्याचा वावर होता. त्यानेच ज्वेलर्सच्या बनावट चाव्या तयार करून घेतल्या. राठोड आणि देवरा या दोन मित्रांना त्याने सीमंधर ज्वेलर्सची माहिती देऊन बनावट चाव्या पोहोचवल्या. त्यानुसार राठोड आणि देवरा हे दोघे चोरी करून पळाले, तर संशय येऊ नये यासाठी परमार हा कोल्हापुरात थांबला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here