कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास सर्जिकल साहित्य पुरवठा करणाऱ्या वाय. पी. पोवारनगरातील न्यूटन एंटरप्रायझेस या वितरक कंपनीस रुग्णालय प्रशासनाने ९ कोटी ५६ लाख रुपये बिलांपैकी आतापर्यंत ८ कोटी रुपये अदा केले असल्याची माहिती प्रशासनानेच दिली.
न्यूटनने परवान्यात बनावटगिरी करून हा ठेका मिळवला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीस अहवाल देण्यास आठ दिवसांची मुदत वाढवून दिल्याची माहिती छत्रपती राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाने सीपीआर प्रशासनास बनावट परवान्याप्रकरणी कारवाई करावी, असे पत्र दिले आहे. त्यावर आपण काय निर्णय घेतला, अशी विचारणा अधिष्ठाता डॉ. गुरव यांना केल्यावर ते म्हणाले की, अजून या प्रकरणाचा चौकशी अहवालच आलेला नाही. चौकशी समितीने आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर काय कारवाई करायची हे वरिष्ठ कार्यालयाशी बोलून ठरवले जाईल. न्यूटनचा परवाना बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.
शासनाच्याच अन्न व औषध प्रशासनाने तसे आपणास कळवले आहे. या कंपनीच्या नावावर कोणताच परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी बनावट परवान्याद्वारे निविदा भरून ठेका मिळवला ही फसवणूक नाही का, अशी विचारणा केल्यावर अधिष्ठातांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. या प्रकरणात बनावट परवान्याद्वारे ठेका मिळवणे व त्या ठेक्याद्वारे सर्जिकल साहित्याचा पुरवठा अशा दोन बाबी आहेत. त्यातील पहिल्या बाबीतील वितरक कंपनीची बनावटगिरी उघड झाली असूनही सीपीआर प्रशासन मात्र कोणतीच कारवाई करण्यास तयार नसल्याचे चित्र पुढे आले आहे.
पहिलीच केस..
एखाद्या कंपनीने औषध किंवा सर्जिकल साहित्य पुरवठ्याचा ठेका भरल्यानंतर त्या व्यवहारातील कागदपत्रांची तांत्रिक छाननी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती आहे. या समितीने न्यूटनचा परवाना खरा आहे की नाही याची चौकशी केली नाही. ज्यांचा रुग्णालयांना साहित्य पुरवठ्याचा व्यवसायच आहे, ती कंपनी असा खोटा परवाना घेऊन निविदा भरेल असे वाटलेच नाही, अशा भ्रमात सीपीआर प्रशासन राहिले आहे. आता ही कंपनी सीपीआरसह राज्यभरात काळ्या यादीत टाकली जाऊ शकते.
कराराचा इथेही झाला भंग
न्यूटन कंपनीने जीईएम पोर्टलवर निविदा भरताना न्यूटन एंटरप्रायझेस या ब्रँडनेमने सर्जिकल साहित्य पुरवठा करण्याची हमी दिली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनी वेगवेगळ्या अन्य ब्रँडचे साहित्य पुरवले आहे. या कंपनीशी करार नेमका काय झाला होता व त्यानुसार त्यांनी साहित्य पुरवठा केला आहे का व त्यानंतरच बिले दिली आहेत का, याची खातरजमा कोणत्याच टप्प्यावर झाली नसल्याचे दिसत आहे. न्यूटनने माल पुरवठा केलेल्या वस्तूच्या किमतीही बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जीईएम म्हणजे काय?
जीईएम म्हणजे गव्हर्नमेंट ई-मार्केटिंग. या वेबसाइटद्वारेच सरकारी रुग्णालयातील राज्यभरातील खरेदी होते. त्यावर वितरक कंपन्यांना कागदपत्रे अपलोड कराली लागतात. त्यांची छाननी करण्याचे काम ज्या त्या रुग्णालयासच करावे लागते. या वेबसाइटसाठी काम कसे करावे, त्यात काही अडचणी आल्यास कुणाशी संपर्क साधावा, यासंबंधीचे कोणतेही प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले गेले नसल्याचे सीपीआर प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले.