उत्कंठा अन् आनंदी चेहऱ्यांनी घेतली आकाशात झेप; कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने ‘इस्त्रो’कडे रवाना

0
68

कोल्हापूर : आकाशातून जाणारे विमान कुतूहलाने पाहण्याचे प्रसंग अनेकदा आले; परंतु त्यामध्ये बसून प्रवास करण्याचे भाग्य जीवनात कधी आले नाही. त्यामुळे मनात कमालीची उत्कंठा, काहीशी भीती घेऊनच ते विमानतळावर पोहोचले.

विमान कधी येणार याची लागून राहिलेली प्रतीक्षा एकदाची संपली आणि पुढे विमानाच्या दिशेने जायला लागले तेव्हा चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून विमानतळावरील चित्रही काहीसे बदलून गेले. उत्कंठा, उत्साह, आनंदाच्या साक्षीने त्यांनी आकाशात झेप घेतली तेव्हा सगळेच बावरून गेले.

महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती शाळेतील इयत्ता ५ वी च्या १७ विद्यार्थ्यांनी शासनामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून उत्तुंग यश संपादन केले.

त्यामुळे या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यांचा हा दौरा चक्क विमानाने असल्याने सर्वच विद्यार्थी खुशीत होते.

कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात हे प्रथमच घडले. या अभ्यास दौऱ्यासाठी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे नेतृत्वाखाली दोन मार्गदर्शक शिक्षक, एक महिला डॉक्टर, १७ विद्यार्थ्यांच्यासह इसरो बंगळुरूकडे रवाना झाले. अभ्यास दौऱ्यासाठीचा येणारा खर्च महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.

आजच्या युगात भविष्यात अनेक क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या कलानुसार सखोल अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे’ असेही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांब्यासह अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना सहलीस पाठवण्यासाठी पालकांनी व नातेवाइकांनी महापालिकेत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. केएमटीतर्फे विद्यार्थ्यांना विमानतळापर्यंत नेण्यासाठी खास बसची व्यवस्था केली होती.

महापालिकेच्या मुख्य इमारतीतील चौकामधून बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आले. तेथे प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, शुभेच्छापत्र व ट्रॉफी देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ल. कृ. जरग विद्यालय जरगनगर, नेहरूनगर वसाहत विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय या मनपा शाळांचा समावेश आहे. याप्रसंगी शिक्षक समिती कोल्हापूर शहरमार्फत पेन व डायरी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here