लाल बावटा संघटनेच्या मागणीला यश
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
३१ डिसेंबर अखेर पर्यंतचे बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे आश्वासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी
लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळला दिले.
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैद्यकीय लाभ मिळतात, परंतु साधारण ५ जानेवारी २०२४ पासुन, नोंदीत कामगारांना लाभाचे अर्ज भरता येत नव्हते,५ फेब्रुवारी रोजी साधारण १५ हजार कामगारांचा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला होता.
योजनांचे स्लॉट ओपन न झाल्यास ८ फेब्रुवारी पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, दरम्यान मंडळाच्या सचिवांशी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी पत्रव्यवहार केला होता.त्यामुळे बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.
दरम्यान आज लाल बावटा संघटनेच्या जिल्हा कमिटीच्या वतिने संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ भरमा कांबळे कॉ शिवाजी मगदूम कॉ प्रकाश कुंभार कॉ संदिप सुतार के नारायण मुंबई यांचे शिष्टमंडळ मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांना भेटले.
विवेक कुंभार यांनी लाभाचे स्लॉट तात्काळ ओपन करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या त्यामुळे कामगारांना लाभाचे अर्ज भरणे सोईस्कर झाले आहे.
या मागणीसह घरकुल योजनेचा शेवटचा ५० हजाराचा हप्ता काढणे, मृत्यु लाभासाठी विवाह नोंद दाखल्याची अट रद्द करणे, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राची अट शिथील करणे , पडताळणी झालेल्या कामगारांच्या लाभाच्या तृटी काढल्या जातात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, तपासणी ते उपचार योजनेतील दवाखाने तात्काळ सुरू करणे, प्रत्येक कार्यालयाला दोन स्मार्ट कार्ड मशिन देण्याच्या सुचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या, ब्लॉक झालेल्या कामगारांना अनब्लॉक करण्या बाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहीती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे व जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी दिली.