कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करतानाच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.
या अनुषंगाने जागतिक बँकेच्या चार सदस्यांच्या समितीने बुधवारी दुपारी कोल्हापूर शहर आणि करवीर, पन्हाळा तालुक्यातील काही ठिकाणी पाहणी केली.
हा प्रकल्प मित्र संस्थेच्या माध्यमातून राबविला जात असून, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर हे करवीर तालुक्यातील चिखली येथील पाहणीवेळी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी शहरातील व्हीनस कॉनर्र, सुतारमळा, दुधाळी, राजाराम बंधारा, तावडे हॉटेल, करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, पन्हाळा तालुक्यातील जोतिबाजवळील गायमुख या ठिकाणी पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
यानंतर संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. जागतिक बॅंकेचे प्रतिनिधी जोलांथा क्रिस्पिन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, सविनय ग्रोव्हर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे उपस्थित होते.