कोल्हापूर : कोरोना आणि लसीकरण काळात झालेल्या खर्चाबाबत अनेक ठिकाणी तक्रारी झाल्यामुळे राज्यभर ऑडिट सुरू करण्यात आले आहे. तीन ऑडिट कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आल्या असून, जिल्हावार वेळापत्रकही देण्यात आले आहे.
त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांमध्ये या ऑडिटला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे ऑडिट ६ मार्च ते ११ मार्च २०२४ या काळात होणार आहे.
एप्रिल २०२० नंतर जगभर कोरोनाची लागण सुरू झाली. भारतात तर पहिल्या लाटेवेळी हाहाकार उडाला. कारण वैद्यकीयदृष्ट्या शासनाच्या अनेक आरोग्यसंस्था या कमकुवत होत्या. ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणारी मोजकी शासकीय रुग्णालये होती. मुळात उपचाराची प्रक्रियाच माहिती नसल्याने केंद्रीय पातळीवरून येणाऱ्या सूचनांचा अंमल केला जात होता.
अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून आवश्यक वैद्यकीय साहित्य, सामग्रीची खरेदी करण्यात आली. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेत स्वत: न अडकता इतर मुख्य अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली. त्यामुळे हातमोजे, सॅनिटायजर, मास्क याची कोट्यवधी रुपयांची खरेदी सुरू झाली. त्या काळात अनेक राजकीय नेते, त्यांचे सगेसोयरे, कार्यकर्ते यांनी कंपन्या काढून मालाचा पुरवठा सुरू केला. अनेक ठिकाणी पालकमंत्री आणि जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांनीही पूरक भूमिका घेतली.
या सगळ्या कारभारात ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांनी आणि ज्यांना हा गैरकारभार सहन झाला नाही अशांनी तक्रारी सुरू केल्या; परंतु अचानक उद्भवलेले आरोग्य संकट असल्याने आपत्कालीन कायद्याचा आधार घेत या सगळ्यांना ‘क्लीन चीट’ देण्याचेच धोरण पुढे आले; परंतु तरीही यातील वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी हे ऑडिट सुरू करण्यात आले आहे.
कोल्हापूरची तक्रार उच्च न्यायालयात
जिल्ह्यातील कोरोना काळातील गैरकारभाराबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता. त्यांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत आता या ऑडिटमध्ये नेमके काय पुढे येते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
काही जिल्ह्यांचे ऑडिटचे वेळापत्रक
- लातूर १६ ते २० फेब्रुवारी २०२४
- उस्मानाबाद २१ ते २४ फेब्रुवारी
- सोलापूर २५ ते २९ फेब्रुवारी
- सांगली १ ते ५ मार्च
- कोल्हापूर ६ ते ११ मार्च
- सिंधुदुर्ग १२ ते १५ मार्च २०२४