लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचा शिवसेनेचा निर्धार, कोल्हापुरातील अधिवेशनात मोदी, शहांचे अभिनंदन

0
74

कोल्हापूर: शिवसेनेच्या येथील राष्ट्रीय अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. याच बरोबर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व म्हणजे ४८ जागा जिंकण्याचा निर्धारही ठरावाद्वारे व्यक्त करण्यात आला.

राज्यात वैविध्यपूर्ण योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ठरावाव्दारे अभिनंदन करण्यात आले. आज शनिवारी दुपारी शिंदे यांचे अधिवेशनात भाषण होणार असून गांधी मैदान येथे संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे.

येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये दुपारी साडेबारानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी, सकाळी ९ पासूनच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. नोंदणी झाल्यानंतर सर्वांना शिवसेनेचा मफलर, नोटपॅड देण्यात येत होते. शाहिरी पोवाड्याने अधिवेशनाची सुरुवात झाली. यानंतर शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलवन करण्यात आले. दिवसभरामध्ये मंत्री गुलाबराव पाटील, किरण पावसकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, रामदास कदम, राजश्री पाटील यांची प्रामुख्याने भाषणे झाली. यातील गुलाबराव पाटील आणि रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेचे प्रचंड आसूड ओढले. दिवसभरामध्ये संघटनान्मक, राजकीय विषय आणि सरकारी योजनांबाबत कार्यशाळा झाली.

या अधिवेशात झालेले ठराव खालीलप्रमाणे

  • भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीबाबत अभिनंदन.
  • देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबाबत अभिनंदन.
  • राम मंदिर प्रतिष्ठापनेबद्दल अभिनंदन.
  • लोकसभा निवडणुकीत मिशन ४८ म्हणजेच सर्व ४८ जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना. कार्यकर्त्यांना तशी दिली शपथ.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले, अशा शिवसेना नेत्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्याचा निर्णय.

यांच्या नावे दिले जाणार पुरस्कार

  • दत्ताजी साळवी यांच्या नावे उत्कृष्ट कामगार पुरस्कार
  • सुधीर जोशी यांच्या नावे नावीन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार
  • दत्ताजी नलवडे यांच्या नावे आदर्श शिवसैनिक पुरस्कार
  • प्रमोद नवलकर यांच्या नावे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
  • वामनराव महाडिक यांच्या नावे उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार
  • दादा कोंडके यांच्या नावे कला क्षेत्रातील पुरस्कार
  • शरद आचार्य यांच्या नावे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

चांगलीच वातावरण निर्मिती

अधिवेशनस्थळी शिवसेनेने चांगलीच वातावरण निर्मिती केली. श्रीराम, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचे कटआऊटस उभारण्यात आले होते. प्रचंड मोठ्या सुसज्ज अशा शामियान्यामध्ये भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले होते. पत्रकारांना मात्र अधिवेशनात मज्जाव असून बाहेर मान्यवर येऊन पत्रकार परिषदा घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here