
कोल्हापूर : देशात लोकशाही धोक्यात आहे, प्रजासत्ताक धोक्यात आहे, राज्यघटना धोक्यात आहे. त्यामुळे आमचे सर्वात पहिले उद्दिष्ट हे भाजपला पराभूत करणे राहील असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार डी. राजा यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सेक्रेटरी गिरीश फोंडे, दिलीप पवार, दिलदार मुजावर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, मोदींनी वास्तवात कोणताही विकास केलेला नाही. त्यांना आम्ही आव्हान देतो की त्यांनी लोकांचे वास्तववादी जीवन मरणाशी निगडित मुद्द्यांवर बोलावे. मानवी विकास निर्देशांकामध्ये देशाचा स्तर घसरला. भूक निर्देशांकमध्ये देश मागे आहे. गरीबी, बेरोजगारीमध्ये जनता होरपळत आहे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये स्तर घसरला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत कारण मोदींची गॅरंटी होती की शेतकऱ्यांना एमएसपी कायदा पारित करतो. पण भाजप सरकारने पलटी मारली व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसली. स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याचे नाटक करणारे हे सरकार त्यांनी केलेल्या एमएसपी सारख्या शिफारशीवर कानाडोळा करत आहे.
कोणतेही मूलभूत काम न करता मोदी सरकार ढोंगी प्रचार करत आहे. ते लोकांची विचार करण्याची शक्ती हायजॅक करत आहेत. मोदींचा कार्यकाळ हा विध्वंसकारी राहिला आहे. आम्ही देशातील सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की त्यांनी जनतेमध्ये जावे व मोदी सरकारच्या विरोधात लोकांना जागरूक करावे. काहीही करून बीजेपीला केंद्रामध्ये पराभूत करावे लागेल.
देशातील घटनाकृत विविध स्वायत्त संस्थांच्यावर हल्ले होत आहेत, हस्तक्षेप होत आहे. निवडणूक आयोग हा बीजेपीचा प्रचार संस्थेसारखा काम करत आहे. आमच्या पक्षाचे खासदार इंद्रजीत गुप्तांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या निवडणूक सुधारणा आयोग शिफारशीच्यांवर अजून देखील संसदेत चर्चा केलेली नाही. पण भारतासारख्या वैविध्य असलेल्या देशांमध्ये भाजप आरएसएस हे “वन नेशन वन इलेक्शन ” योजना लागू करू पाहत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा याला विरोध आहे. ईव्हीएम शिवाय मतपत्रिकेवर देशात निवडणूक घेण्याची आमची मागणी आहे.
शिर्डी व परभणी जागेची मागणी
नुकतेच सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रोरल बॉण्ड बद्दल स्वागतार्ह निर्णय दिला आहे. आम्ही याला संसदेमध्ये पूर्वीच विरोध केला होता. अरुण जेटली हयात असताना त्यांनीच “मनी बिल” च्या नावाखाली इलेक्टोरल बिल आणले होते. या इलेक्ट्रॉनिक मध्ये कोणती पारदर्शकता नव्हती. कॉर्पोरेट चा ९८ टक्के पैसा केवळ भाजप या एका पक्षाला मिळाला आहे.
पक्षाचे राज्य सेक्रेटरी सुभाष लांडे म्हणाले,” महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करून राजकीय संस्कृती लयास घालवली आहे. जनता भाजपला महाराष्ट्रात सडेतोड उत्तर देईल. आम्ही देशपातळीवर इंडिया आघाडी व महाविकास आघाडी बरोबर आहोत. शिर्डी व परभणी अशा दोन लोकसभा मतदारसंघाची आम्ही आघाडीकडे मागणी केली आहे. तिथून निवडणूक लढण्याची पक्षाची तयारी चालू आहे.
