कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

0
57

गांधीनगर : तावडे हॉटेल, स्वामी शांती प्रकाश घाट गांधीनगर आणि वळीवडे सुर्वे बंधारा येथे पंचगंगा नदीपात्रातप्रदूषणामुळे लाखो मासे मृत झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंचगंगा नदीप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचा फटका जलचर प्राण्यांना बसत आहे. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी शिरोली ब्रिजखाली, तसेच गांधीनगर येथील स्वामी शांती प्रकाश घाट आणि वळीवडे येथील सुर्वे बंधारा नदीपात्रात अक्षरश: मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

मासे मृत झाल्याने पाणी प्रदूषणात वाढ होत आहे. वळीवडे येथील नदीपात्रातील पाणी जनावरांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी वापरले जाते. परंतु, असे दूषित पाणी जनावरांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर मृत माशांची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here