हुपरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात, कारवाई न करण्यासाठी महिलेकडून घेतली लाच

0
209

हुपरी : किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी महिलेकडून ९ हजारांची लाच घेताना हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार दिलीप योसेफ तिवडे (वय ५२, रा. ॲपल सरस्वती हॉस्पिटलनजीक, कदमवाडी, कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

ही कारवाई सायंकाळी साडेसहा वाजता महिलेच्या घरातच केली. याप्रकरणी हुपरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत समजलेली माहिती अशी, हुपरीतील जुने बसस्थानक चौकानजीक राहणाऱ्या महिलेने कुत्री पाळली आहेत. कुत्र्यांचा रहिवाशांना त्रास होत होता. या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतल्यावरून या महिलेशी अनेकांचा वाद होत असे. त्यामुळे रहिवाशांनी पोलिस ठाण्यात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. याबाबतचा तपास दिलीप तिवडे याच्याकडे होता. याप्रकरणी कारवाई करू नये यासाठी तिवडेने महिलेकडे १० हजारांची लाच मागितली. नऊ हजारवर तोडगा मान्य झाला.

ही रक्कम सोमवारी देण्याचे ठरले होते. दरम्यानच्या कालावधीत महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधकचे पोलिस निरिक्षक बापू साळुंखे, संजीव बंबरगीकर व सहकाऱ्यांनी सापळा रचून तिवडे याला या महिलेकडून ९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

हुपरी पोलिस ठाण्यात अशा पद्धतीच्या यापूर्वी पाच कारवाया झाल्या आहेत. या कारवाईत पोलिस निरीक्षकासह अर्धा डझनहून अधिक पोलिसांवर कारवाई झाल्याचा इतिहास आहे. येथील पोलिसांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे हुपरी पोलिस ठाणे बदनाम होण्याबरोबरच जनतेत पोलिसांबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे सध्याचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना हुपरीत जनता दरबार भरवून जनतेची समजूत काढावी लागली होती. त्यानंतर सोमवारी घडलेल्या तिवडे लाचखोरी प्रकरणाने याला उजाळा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here