Kolhapur: महापूर नियंत्रणाचा प्रकल्प होईपर्यंत पूर सहन करायचा का?; नदीपात्रातील भराव, झाडे, गाळ काढण्याची गरज

0
57

कोल्हापूर : कोल्हापूरसहसांगलीला येणाऱ्या महापूर नियंत्रणासाठीचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत स्थानिक पातळीवर महापालिका, पाटबंधारे विभाग आणि नदीपात्राच्या जवळ असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करणे गरजेचे आहे.

प्रकल्प कसा राबवायचा याचे सर्वेक्षण करण्यासाठी ६ महिने लागणार आहेत. आता तीन महिन्यांनी पावसाळा सुरू होईल, पुढच्या तीन वर्षांत किमान तीनवेळा तरी पूर येण्याची शक्यता आहे. या तीन वर्षांसाठी संबंधित विभागांनी त्यांच्या पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने मित्र संस्थेच्या माध्यमातून पंचगंगा व कृष्णा नदीला येणाऱ्या महापूर नियंत्रणासाठी ३२०० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मागील आठवड्यात बँकेच्या टीमसमाेर प्रकल्पाचे सादरीकरण झाले. त्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

हा प्रकल्प पूर्ण व्हायला किमान ३ किंवा त्याहून जास्तच वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत कोल्हापूरकर व सांगलीकरांनी महापूर आला तर काय करायचे या प्रश्नावर आता प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी काेल्हापूर महापालिका, पाटबंधारे विभाग, नगरपालिका, नदीकाठ नजीक राहणारी गावे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न केले तरी पूर नियंत्रणासाठी मदत होईल.

हे हटवले तरी पूर नियंत्रित होईल

  • पंचगंगा घाटावर नवीन पूल उभारताना नदीपात्रात बांधलेले रस्ते, भराव, पिलर, भिंती.
  • पुराने वाहून आलेल्या मातीचा थर भोवतीने साचून नदीचे पात्र कमी झाले. प्रवाहाची दिशा बदलली.
  • शिरोली भागात एकाच ठिकाणी तीन पुलांच्या उभारणीमुळे मोठ्या प्रमाणात भराव तयार.
  • पुलांच्या ठिकाणी तयार झालेले पोटमाळे काढून पाणी वाहण्यासाठीचा मार्ग मोकळा व्हावा.
  • नदीपात्रातील मोठी झाडे, गवत, सिमेंटचे थर, बांधकामासाठी तात्पुरते तयार केलेले रस्ते.
  • बंधाऱ्याजवळ साचलेला गाळ.

प्रकल्पाचे टप्पे

  • पहिले सहा महिने : सर्वेक्षण
  • पुढचे सहा महिने : प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे
  • त्यानंतरचे सहा महिने : निविदा प्रक्रिया, नियुक्ती
  • त्यानंतरचे दीड ते दोन वर्षे : प्रत्यक्ष प्रकल्पातील कामांची अंमलबजावणी.

पूर नियंत्रणासाठीचे प्रकल्प होतील तेव्हा होतील, पण तोपर्यंत स्थानिक प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करावेत. वर्षानुवर्षे केलेले सिमेंटचे भराव, गाळ, गवत, झाडे, पुलांच्या बांधकामाच्या वेळी टाकलेले साहित्य, तयार झालेली लहान बेटे हटविण्यात यावीत. –महादेव खोत निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here