
प्रतिनिधी : जानवी घोगळे
पुणे : कोथरूड परिसरातील अलीकडील गुन्हेगारी प्रकरणांबाबत आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरात रोजच्या जीवनात दहशत निर्माण होईल असे प्रकार होऊ नयेत, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलवून त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही. आम्ही कधीही गुन्हेगारीला पाठिंबा दिलेला नाही. एखाद्या नेत्याची जाणीवपूर्वक बदनामी केली तर त्याचा परिणाम शहराच्या प्रतिमेवर होतो. परदेशी गुंतवणूक आणि उद्योग येत असताना अशा नकारात्मक गोष्टींमुळे शहराची प्रतिमा धोक्यात येते. दररोज हजारो लोक भेटायला येतात, त्यात एखादा गुन्हेगार असू शकतो. पण त्यामुळे आमचा त्याच्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे. पोलिस प्रशासनाला आम्ही स्पष्ट सांगितले आहे, आमच्या नावाने कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी त्याकडे दुर्लक्ष करा. गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी ठोस कारवाई करा. लेखी तक्रारी आल्या की तातडीने कारवाई करा.
पाटील पुढे म्हणाले, पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी समोर बोलवून त्यांच्यावर मानसिक दबाव आणावा. गेल्या काही महिन्यांत खुनाच्या घटनांत घट झाली आहे आणि पोलिसांचा दबदबा वाढला आहे. कोथरूड हा हिंदू बहुल भाग आहे. येथे काही मुस्लिम तरुणांच्या हालचाली दिसत आहेत. धार्मिक कारणांमुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्क राहावे असे पाटील यांनी सांगितले. प्रत्येक धर्माचा आदर राखणे आवश्यक आहे, पण उपासना कधी, कुठे आणि कशी करायची यावर शिस्त पाळली पाहिजे. धर्मादाय आयुक्तांनी कोथरूडमधील दर्ग्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नीलेश घायवळ प्रकरणाबाबत बोलताना पाटील म्हणाले, नीलेश घायवळला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे, पण त्यास कोणतेही पुरावे नाहीत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी निराधार आरोप केले आहेत. नीलेश घायवळ आणि माझे संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. उलट त्याला पासपोर्ट मिळवून देणाऱ्यांचे नाव समोर यायला हवे, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.

