कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शिवारातच नव्हे, तर अगदी घरातही त्यांनी शिरकाव केला आहे. गत दोन दशकात बिबट्यांच्या ज्या पिढ्या कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात जन्मल्या त्या पिढ्यांमध्ये जनुकीय बदल झाला आहे.
जंगल हा अधिवासच ते विसरले आहेत. शिवारच त्यांनी स्वत:चा अधिवास मानलाय. त्यामुळे शासनाने जरी बिबट्यांना जेरबंद करीत जंगलाच्या अधिवासात सोडले तरी ते पुन्हा शिवारातच वावरतील, अशी भीती प्राणितज्ज्ञांना आहे.
बिबट्या हे हिंस्त्र श्वापद; पण चोरटा शिकारी. रानडुक्कर, श्वान, शेळ्या, मेंढ्या हे त्याचं प्रमुख खाद्य. शिवारात हे खाद्य त्याला मुबलक प्रमाणात मिळतं. नाहीच मिळालं तरी प्रसंगी खेकडेही तो खातो. कोणत्याही मार्गाने तो आपली भूक भागवतो.
कऱ्हाडसह पाटण तालुक्यात सध्या जेवढे बिबटे वावरताहेत तेवढे बिबटे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही नाहीत. प्रकल्पातील बिबट्यांची संख्या पन्नास आहे, तर कऱ्हाड, पाटणच्या प्रादेशिक वनहद्दीत आणि शिवारात शंभरपेक्षाही जास्त बिबटे असावेत, असे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी सांगितले, तर बिबट्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आताच हालचाली झाल्या नाहीत, तर जुन्नरसारखीच कऱ्हाड, पाटणची भविष्यातील परिस्थिती गंभीर असेल, अशी भीती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य आणि प्राणी अभ्यासक नाना खामकर आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात जुन्नरपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात हा धोका गत काही वर्षांच्या तुलनेत कित्येक पटींनी वाढला आहे. तसेच पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस शेतीमध्ये तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आंबा आणि काजूच्या बागांमध्येही बिबट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील जुन्नर विभागात २००१ आणि २००२ साली बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे ११ लोकांचा बळी गेला. वनविभागाने १०३ बिबट्यांना पकडून त्यांच्या शेपटीत विशिष्ट प्रकारची ‘चिप’ बसवून काही बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारण केंद्र, तर काहींना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बंदिस्त केले. तसेच सुमारे १६ बिबटे चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. मात्र, एवढे करूनही जुन्नरमधील बिबट्यांचा प्रश्न सुटला नाही.
जंगल हा अधिवासच बिबट्या विसरले आहेत. उसाचे शेत हेच जंगल असल्याचा आनुवंशिक बदल त्यांच्यामध्ये झाल्याचे दिसून येते. कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील प्रादेशिक वनहद्दीत शंभरपेक्षा जास्त बिबटे असावेत. – नाना खामकर, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो.