कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
कोल्हापूर- कोल्हापुरात उद्या शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाची सभा होणार आहे. या सभेअगोदरच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याने या उद्योजकांनी विस्तारीकरणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जागा मागितल्या असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी मुश्रीफ यांच्यावर केला. यावर आता मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एमआयडीसीत नोकऱ्या भूमीपुत्रांनाच द्यायला हव्यात या मागण्या योग्य आहेत. भूमीपुत्रांच्या जमीनी त्या उद्योगासाठी गेल्या आहेत. आरोप करण्यासाठी जागा नाही त्यामुळे ते आमच्यावर काहीही आरोप करत आहेत. शरद पवारांना अशा छोट्या मैदानात आणायला नको होते. पवार साहेबांची सभा तपोवन मैदान अशा ठिकाणी हवी होती, असंही मुश्रीफ म्हणाले.
“रोहित पवार अजुनही छोटे आहेत. त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे, त्यांनी कुटुंबातील वाद मिटवायला हवेत.
वाढवायला नको होते, असंही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
‘मुश्रीफांचे कार्यकर्ते, नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास’
कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याने या उद्योजकांनी विस्तारीकरणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जागा मागितल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची आज शुक्रवारी कोल्हापुरातील दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आ.पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील एमआयडीसींमधील उद्योजकांना मंत्री मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईक त्रास देत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे अनेक दिवसांपासून येत आहेत. पक्ष एकसंघ असताना आम्ही जिल्ह्यातील संबंधित नेत्याशी याबाबत बोललोही होतो.
पण, त्यांनी वेगळीच कारणे सांगितली. उद्योजकांना त्रास दिला जात असल्याने ते कोल्हापुरात उद्योगाचा विस्तार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. परजिल्ह्यात विस्तारीकरणासाठी हे उद्योजक जागा मागत आहेत. नेत्यांचे कार्यकर्तेच जर असा त्रास देत असतील तर या जिल्ह्यात उद्योग, रोजगार कसा निर्माण होईल.