“अजितदादा गटाचे १२ बडे नेते, आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार”; काँग्रेस नेत्याचा दावा

0
82
"अजितदादा गटाचे १२ बडे नेते, आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार"; काँग्रेस नेत्याचा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. महाराष्ट्रातील खासदारकीची लढत ही मुख्यत्वे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात रंगणार आहे.

वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी अद्यापही दोन पैकी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी मविआसोबत लढणार असल्याचे बोलले जात आहे.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीसोबत लढणार अशी शंका व्यक्त केली जात आहे. पण असे असले तरी महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तशातच अजित पवार गटाचे १२ बडे नेतेमंडळी भाजपात प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

“धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार,” असा दावा अतुल लोंढे यांनी त्यांच्या ट्विटमधून केला आहे.

काही वेळाने अतुल लोंढे यांनी ते ट्विट डिलीट केले आणि नंतर पुन्हा नव्याने एक ट्विट करत ही सुत्रांची माहिती असल्याचे म्हटले. नव्याने केलेल्या ट्विटमध्ये लोंढे यांनी आधीच्या ट्विटमधील नेत्यांची नावे काढून टाकली. परंतु १२ बडे नेते भाजपात जाणार या दाव्यावर ते कायम आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि महायुतीतील इतर पक्ष यांच्यात लोकसभेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष लोकसभेत एकत्र लढणार आहेत.

त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: मुंबईत येऊन अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून गेले. तरीदेखील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांत अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळेच काँग्रेस नेत्याकडून असा दावा केल्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here