सरवडे : आपल्या कार्यकर्त्यांना विरोधकांच्या दावणीला बांधणाऱ्या आणि वरिष्ठांचे आदेश धुडकावणाऱ्या ए. वाय. पाटील यांना जनतेने ‘बिद्री’च्या निवडणुकीत जमिनीवर आणले. परंतु स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणाऱ्या ए.वाय.
यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांनी राजकीय आत्मघात करून घेतल्याचा घणाघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने नरतवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के.पी. पाटील होते.
मुश्रीफ म्हणाले, मेहुण्या-पाहुण्यांचे नातेसंबंध टिकावेत यासाठी नेहमी प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना ते शिंदे गटात जाणार, भाजप प्रवेश व महामंडळावर निवड होणार अशा चर्चा होत्या.
बिद्रीच्या निवडणुकीत त्यांच्या अटीशर्ती मी मान्य केल्या, पण आम्हाला खेळवत त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली. ते स्वाभिमानी कार्यकर्त्यांना रुचले नाही. ते पराभवाने उद्विग्न झाले असून खोटेनाटे आरोप करत आहेत. पण त्यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा असून जिल्हा बँकेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व कामासाठी कार्यकर्त्यांनी मला थेट भेटावे.
के. पी. पाटील म्हणाले, पहिल्या निवडणुकीपासून राधानगरीच्या जनतेने मला पाठबळ दिले. परंतु मध्यंतरी आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात सोळांकुरच्या टोलनाक्याने आपल्यात व जनतेत अंतर आले. हा टोलनाकाच कायमचा बंद झाला आहे. जनतेने अडीअडचणी सोडविण्यासाठी थेट आपल्यापर्यंत यावे. माझ्या कार्यकर्त्यांची अडवणूक कराल तर खबरदार, असा सज्जड इशाराही त्यांनी ए.वाय. यांना दिला.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, केडीसीसीचे संचालक भैय्या माने, तालुकाध्यक्ष व गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, भोगावतीचे संचालक धैर्यशील पाटील, हुतात्मा सूतगिरणीचे अध्यक्ष उमेश भोईटे, तानाजी ढोकरे, तानाजी खोत, नामदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील, अनिल साळोखे, विनय पाटील, मनोज फराकटे, विकास पाटील, अभिषेक डोंगळे, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, फिरोजखान पाटील, धनाजी देसाई, पंडित केणे, मधुआप्पा देसाई, दीपक किल्लेदार, विश्वनाथ कुंभार, एकनाथ पाटील, अशोक चौगले आदी उपस्थित होते.