Kolhapur Politics: लोकसभेसाठी रोज एक नवीनच नाव चर्चेत, कार्यकर्ते बुचकळ्यात

0
60

कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची रोज नवीन नावे चर्चेत येत असल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. ‘इच्छुकांच्या पोटात गोळा आणि नुसतेच पळा पळा’ अशी स्थिती निर्माण झाली असून, दिल्लीहून कधी एकदा नावे जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांचे नाव निश्चित मानले जात आहे. शाहू छत्रपती यांची वाढलेली संपर्क माेहीम आणि सतेज पाटील यांनी रोज सुरू ठेवलेले नियोजनबद्ध कार्यक्रम आणि बैठक यातून हे स्पष्ट झाले आहे. हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांचीही उमेदवारी निश्चित आहे. मात्र महायुतीला अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असून, त्यांनी मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठीचा हट्ट सोडला नसल्याचे सांगण्यात येते, तर कोल्हापूरसाठी भाजपकडून समरजित घाटगे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे.

हातकणंगलेमध्येही माने यांना पर्याय म्हणून आमदार विनय कोरे, शौमिका महाडिक, डॉ. संजय पाटील यांची नावे पुढे आणली जात असून यातून दिल्लीच्या पातळीवर काय निर्णय होणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. डॉ. पाटील यांनी यापूर्वीही २००४ मध्ये शिवसेनेकडून हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढवून ३ लाख २१ हजार मते मिळवली होती हे प्रकर्षाने सांगण्यात येत आहे. रविवारी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, या दोन्ही जागा आणि उमेदवार राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र मंडलिक यांनी आपले तालुकावार दौरे सुरू ठेवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here