आई- वडील बीडमध्ये सर्वसामान्य शेतकरी. तिचे वय अवघे तेरा वर्षे. मात्र, हातात स्मार्टफोन आला आणि एका क्लिकवर सर्व जग उपलब्ध झाले. तेव्हा स्नॅपचॅट या चॅटिंग अपवर तिची १३ वर्षांनी मोठ्या तरुणासोबत ओळख झाली.
सोळाव्या वर्षी शिक्षणानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर ती त्याला भेटलीदेखील. मात्र, धोका वाटायला लागल्याने तिने संपर्क तोडला. मात्र, भेटीदरम्यानच्या छायाचित्रावरून ब्लॅकमेल करत तब्बल पाच वर्षांनंतर तो तिच्या शहरातील होस्टेलपर्यंत पोहोचला. घाबरलेल्या तरुणीने दामिनी पथकाला कळवल्यानंतर सोमवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मूळ बीडची असलेली १७ वर्षीय रेखा (नाव बदलले आहे) शहरात पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेते. बीडला शालेय शिक्षण घेत असताना स्नॅपचॅटवरून तिची बारामतीच्या आकाश सोनवणेसोबत ओळख झाली होती.
संवाद वाढत गेला. घरी असल्याने त्यांची भेट शक्य झाली नाही. मात्र, दहावीनंतर रेखाचे शिक्षणानिमित्त घराबाहेर पडणे सुरू झाले. तेव्हा दीड वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा भेटले.
त्यानंतर रेखाला तो २९ वर्षांचा चालक असून त्याच्याविषयी सत्य परिस्थिती कळाल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. आकाशने वारंवार भेटण्यासाठी हट्ट सुरू केला.
रेखाने प्रतिसाद देणे बंद केल्यानंतर भेटीत काढलेले छायाचित्र पाठवून ब्लॅकमेलिंग सुरू केले. रेखा कुठे शिकते, कुठे राहते, इथपर्यंत माहिती काढली. पाच दिवसांपासून त्याने रेखाला महाविद्यालयात, होस्टेलबाहेर भेटायला येत असल्याचे मेसेज पाठवणे सुरू केले होते.
विकृतीची हद्द, टॅटू काढण्याचा हट्ट
सोमवारी त्याने रेखाला कांचनवाडी उड्डाणपुलाखाली भेटण्यासाठी बोलावले. तू माझ्या हातावर चाव, मला तेथे टॅटू काढायचाय, असा हट्ट करण्यापर्यंत आकाशची मजल गेली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याची रेखाला जाणीव झाली.
घरी कळू द्यायचे नव्हते. तिने दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना कळवले. मिरधे यांनी तिला भेटून प्रकार समजून घेतला. अंमलदार निर्मला निंभोरे, संगीता परळकर, अमृता भोपळे, प्रियांका भिवसने यांनी दुपारी सापळा रचला. रेखाने आकाशला भेटायला बोलावले. आकाश येताच साध्या वेशात दबा धरून बसलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पथकाने रेखाला देखील समजावून सांगितले. अजाणत्या वयात झालेल्या चुकीची जाणीव झाल्याने तिला रडू आवरत नव्हते. तिला धीर देऊन पोलिसांनी होस्टेलवर सोडले. आकाशवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.