प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा कागल
पंतप्रधान मोदींनी आज बंगळुरूमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं, त्या ठिकाणाला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ असं नाव दिलं जाणार आहे. यासोबतच, चांद्रयान-2 मधील लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ म्हटलं जाणार आहे.
चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर ते ग्रीस दौऱ्यावर गेले. यानंतर भारतात आल्यावर त्यांनी थेट इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत, चांद्रमोहिमेच्या यशासाठी त्यांचं अभिनंदन केलं.
पंतप्रधान मोदींनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या वैज्ञानिकांचं अभिनंदन आणि कौतुक केलं. सोबतच त्यांनी एक मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरलं आहे; त्या जागेला आता ‘शिवशक्ती पॉइंट’ म्हटलं जाणार आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आणखी एक मोठी घोषणा केली. भारताची दुसरी चांद्रमोहीम ही अखेरच्या टप्प्यात जाऊन अयशस्वी झाली होती. चांद्रयान-2 मधील विक्रम लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं होतं. हे लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या जागेचंही नाव पंतप्रधानांनी जाहीर केलं. या जागेला आता ‘तिरंगा पॉइंट’ म्हणून ओळखलं जाणार आहे.
देशाला देणार प्रेरणा
हे खरंतर चार वर्षांपूर्वीच ठरलं होतं, मात्र चांद्रयान-3 मोहिमेनंतरच एकदमच दोन्ही नावांची घोषणा करण्याचा विचार आपण केला, असं मोदींनी म्हटलं भारताने चांद्रमोहीम यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाची आठवण हे नाव आपल्याला करुन देईल.
अपयश हा शेवट नसतो, हे या नावातून आपल्याला कळेल; असंही मोदी यावेळी म्हणाले.