कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे बारा तासात कोल्ह्याने तिघांवर हल्ला करून चावा घेतला. यात एका बालिकेसह महिला आणि वृद्धाचा समावेश आहे. या प्रकारामुळे परिसरात कोल्ह्याची दहशत निर्माण झाली असून, वन विभागाच्या कर्मचा-यांकडून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजनंदिनी शिवराज सरनाईक ही चार वर्षांची बालिका शनिवारी (दि. २६) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घराच्या अंगणात गेली. त्याचवेळी समोरून आलेल्या कोल्ह्याने तिच्यावर हल्ला करून चावा घेतला.
तिच्या ओरडण्याचा आवाज येताच नातेवाईक घरातून बाहेर आल्याने कोल्हा पळून गेला. काही अंतर पुढे कोल्हापूर-राधानगरी मार्गावर कोल्ह्याने बळवंत लहू पाटील (वय ६०, रा. आवळी बुद्रुक) यांच्यावर हल्ला करून त्यांच्या हाताला चावा घेतला.
दोन्ही जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे गावात दहशत निर्माण झाली असतानाच, रविवारी (दि. २७) सकाळी नऊच्या सुमारास ओढ्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या शीला कृष्णात चौगुले (वय ४०, रा. आवळी बुद्रुक) यांच्यावर कोल्ह्याने हल्ला केला.
त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली. त्यांनी आरडाओरडा केल्याने कोल्ह्याने धूम ठोकली. जखमी शीला यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
एकाच गावात बारा तासात तिघांवर कोल्ह्याने हल्ला केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आवळी बुद्रुकमध्ये दाखल झाले असून, स्थानिकांच्या मदतीने हल्लेखोर कोल्ह्याचा शोध सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिका-यांनी दिली.