प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा गडचिरोली :महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीमाभागात पोलीस माओवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला असून १२ माओवादी ठार झाल्याची माहिती आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या सी सिक्सटी कमांडो जवान आणि माओवादी यांच्यात बांदे परिसरात चकमक झाली. दरम्यान, १२ माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५१ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सातत्याने पोलीस आणि माओवाली यांच्यात चकमक उडत आहेत. बुधवारी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले. वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ १२ ते १५ माओवादी तळ ठोकून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी डीवाय एसपींच्या नेतृत्वाखाली ७ C60 पथक मोहिमेवर पाठवण्यात आले होते.वांडोली गावाजवळ दुपारच्या सुमारास जोरदार चकमक सुरू झाली. बुधवारी १७ जुलै रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत ६ तासांहून अधिक काळ दोन्ही बाजून गोळीबार सुरू होता. दरम्यान, घटनेनंतर आतापर्यंत १२ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर ३ AK47, 2 INSAS, १ कार्बाइन, १ SLR यासह ७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. DVCM लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम, टिपागड दलाचा म्होरक्या अशी मृत माओवाद्यांची ओळख पटली आहे. या चकमकीत सी सिक्सटी कमांडो पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील हे जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी गडचिरोलीत आणण्यात आले आहे.
Home Uncategorized गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई चकमकीत १२ माओवादी ठार; कारवाईतील सहभागी जवानांना ५१...