कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : या देशासाठी मराठा समाजाने दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळे कोणा अधिकाऱ्याकडून केलेले आक्षपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे.
ते स्वतः जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याबाबत दोनच दिवसांत निर्णय घेतील, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. रविवारी सकल मराठा समाज बांधवानी क्षीरसागर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या विधानाबद्दल माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, लोकांच्या हितासाठी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकाऱ्यांचे असते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणत्याही जाती – धर्माबाबत चुकीचे वक्तव्य करू नये. जर जिल्हाधिकारी रेखावार यांनी केलेल्या वक्तव्यांची माहिती मिळाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही गांभीर्याने विचार केला असून दोन दिवसांत त्यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासित केले आहे.
क्षीरसागर पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मोर्चातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अग्रभागी होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने ते झटत आहेत. आरक्षण प्रश्नी लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी कोल्हापुरातील सकल मराठा समाज बैठक घडवून आणू.
ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, आरक्षण नसल्याने मराठा समाज अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. अशातच जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासारखे अधिकारी म्हणजे नाकापेक्षा मोती जड आहेत असेच म्हणावे लागेल. अशा मराठा द्वेशी अधिकाऱ्याची तातडीने उचलबांगडी करावी.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे, माजी महापौर आर.के. पोवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, बाबा पार्ट, संगीता खाडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
हद्दवाढ, खंडपीठ असे सर्व प्रश्न सुटणार
दिवाळीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी अपेक्षा चर्चेच्या अखेरीस बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केली. यावर क्षीरसागर म्हणाले, कोणालाही न दुखावता हद्दवाढीचा निर्णय होणार आहे. त्याचबरोबर खंडपीठासह शहराचे महत्त्वाचे प्रश्न दिवाळीपूर्वी सुटतील.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही तक्रार
मराठा आरक्षणप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाची सखोल चौकशीसह दहा दिवसांत त्यांची बदली करावी, अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सकल मराठा समाज शिष्टमंडळाने शनिवारी केली.
आज पालकमंत्र्यांची भेट घेणार
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाबद्दल आज, सोमवारी सकाळी ८ वाजता ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांची सकल मराठा समाजचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.