आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका राज्यातील सर्वच पक्ष आणि गटांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित

0
80

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्ष आणि गटांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विभागातील सहा जिल्ह्यांत पावसाचा दुष्काळ असला तरी राजकीय सभांचा सुकाळ आहे.

दररोजच्या मंत्री, नेत्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासकीय यंत्रणा मात्र हतबल आहे. अस्मानी संकटावर कुणीही जास्त बोलत नसून गद्दारी, गटबाजीवरून एकमेकांवर आरोपांचा पाऊस सभेतून पडत असल्याचे दिसते.

दुष्काळ मोजण्यासाठी जशी पहिली, दुसरी, तिसरी कळ असते, तशी राजकारण्यांच्या एक मागोमाग एक कळांचा पाऊस सध्या मराठवाड्यात सुरू आहे.

गेल्या आठवड्यात शरद पवार यांची सभा बीडमध्ये झाली. पवार दोन दिवस मराठवाड्यात होते. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बीड कुणाचे, हे आजमावून पाहण्यासाठी सभा घेतली.

हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ रोजीच सभा घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम रविवारीच परभणीत घेतला.

राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी २६ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत पक्षाची ताकद आजमावली.

तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी २७ रोजी एन-३ मधील महाविद्यालयात मेळावा घेतला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी २६ ऑगस्टला वैजापूरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली.

२५ ऑगस्ट रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका बैठकीच्या निमित्ताने बीडच्या सभेसाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. २ सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत.

मराठवाड्याची परिस्थिती
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील खरीप हंगाम संपुष्टात आला आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस झाला आहे. सहा जिल्ह्यांतील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या काळात मोठे संकट आहे.

बँका, सावकारांकडून कर्ज घेत खरिपात केलेल्या पेरण्या हातून जाण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत निर्धार सभा, स्वाभिमान सभा, उत्तर सभा, कार्यकर्ते मेळाव्यांचा पाऊस मात्र विभागात जोरदार बरसतो आहे. मराठवाड्यात दुष्काळी स्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघण्यापलीकडे दुसरे काहीही सध्या दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here