प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
सांगली : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज २४ ऑगस्ट रोजी मूक आंदोलन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीवर लौगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी महिला आणि मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत आहेत.सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेने हादरले. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संजय माने या ३५ वर्षीय आरोपीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगली शहरातील संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली. सांगली शहर काँग्रेस च्या जयश्री पाटील, भाजपा चे शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच दिड तासात ताब्यात घेतले. संशयित आरोपी संजय माने २०११ साली सांगली येथील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो १४ वर्षाची शिक्षा भोगत आहे. तो सध्या पॅरोल रजेवर आला होता.मागील महिन्यात त्याने पीडित मुलीस तू मला आवडतेस, असे म्हणून विनयभंग केला होता. त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. काल २३ ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली. आज शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत घोषणबाजी केली.