कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाश्यावर आणण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, मंदिरे व पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे. ही फक्त सुरुवात असून येत्या काळात भूमिगत विद्यूत वाहिन्या तसेच दर्शन रांगा व वाहनतळही जमिनीखालून केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या कोल्हापूरच्या वैभवाला वर्षभरात नवी झळाळी मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
अंबाबाई भक्तांसाठी भवानी मंडप येथील हुजूर पागा इमारतीतील स्वच्छतागृह व दक्षिण दरवाजासमोर उभारण्यात आलेल्या चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शाहू छत्रपती, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी अंबाबाई मंदिर व भवानी मंडप परिसराची पाहणी केली.
मंत्री केसरकर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ८३ लाखांत स्वच्छतागृह व ११ लाख ७८ हजार रुपयांच्या निधीतून चप्पल स्टॅन्ड उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरातील माहिती केंद्र पागा इमारतीत हलविले जाईल.
शाहू महाराजांची सूचना व पुरातत्व विभागाच्या संमतीने कामे केली जात असून पूर्वीचा मंदिर परिसर उभा केला जाणार आहे.
कामांची गती संथ असली तरी पुरातत्वचे निकष, गुणवत्ता व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यात घेतले जात आहे. सर्व कामे चांगली व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत असून येत्या काळात कोल्हापूरला नवी झळाळी मिळेल.