प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून त्यात आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे व अजित पवार यांना देण्यात येणार आहे. येत्या एक दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तर नाराज एकनाथ शिंदे यांची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॅार्म्युलावर चर्चा सुरु झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक २१ मंत्रिपदे मिळू शकेल. तर शिवसेना शिंदे गटाला १२ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला १० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरले असल्याचीही माहिती मिळत आहे. पण, शपथविधीच्या सोहळ्यात महायुतीचे २० आमदार पहिल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यात सर्वाधिक म़ंत्री भाजपचे असणार आहे.