प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर :काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रस्त्यावरील वाढत्या अपघातामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली. मात्र या काही हेल्मेट सक्तीच्या विरोधात जनक्षोभ निर्माण झाल्याने अखेर त्यावेळच्या राज्य सरकारला हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. परंतु आता पुन्हा एकदा राज्य सरकारने राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेत अपर पोलिस संचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधिकक्षकांना पत्र पाठवित हेल्मेट सक्ती लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
वाहतूक अपर पोलिस महासंचालका अरविंद साळवे यांनी राज्यातील ठाणे शहर, पुणे शहर, नागपूर शहर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर शहर, नवी मुंबई शहर, अमरावती शहर, पिंपरी चिंचवड, मिरा भाईंदर-वसई विरार आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांना, तर राज्यातील अकोला, अमरावती (ग्रा.), बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजी नगर (ग्रा.) , जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, पुणे (ग्रा.), सांगली, सातारा, भंडारा, सोलापूर (ग्रा.), चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर (ग्रा.) अहमदनगर, धुळे, जळगांव, नाशिक (ग्रा.), नंदूरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, ठाणे (ग्रा.), पालघरच्या पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवित हेल्मेट सक्ती लागू करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत.
जे दुचाकीस्वार हेल्मेट वापरणार नाहीत अशां दुचाकीस्वारांवर मोटार वाहन कायदा १९८८ तील सेक्शन १२९ नुसार दुचाकीस्वार आणि पिलियन रायडर्स अर्थात मागे बसलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि विना हेल्मेट पिलीयन रायडर्स यांच्यावर १२९/१९४ डी एमव्हीए हेड खाली, दुचाकीस्वाराची आणि पिलीयन रायडर्सची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे यापुढे १२९/ १९४ (डी) एमव्हीए शीर्षकामध्ये बदल करण्यात येत असून यापुढील कारवाई १) विना हेल्मेट दुचाकीस्वार, २) विना हेल्मेट पिलीयन रायडर्स अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली आता कारवाई करण्यात येणार असून या कारवाईमुळे राज्यातील रस्ते अपघातात जखमी आणि मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येला आळा बसेल अशी आशा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली.