अग्रलेख…..राखेतल्या मायाजालाला लागला ‘मोक्का’

0
92

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा बीड जिल्ह्यातील मस्साजोग गांवचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात अखेर सव्वा महिन्याने वाल्मिक कराडवर ‘मोक्का’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराडचे या हत्येतील सुदर्शन घुले, विष्णु चाटे याचे झालेले संभाषण हे मोठा पुरावा म्हणून पुढे आले आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेला सव्वा महिना लागला. आता ‘मोक्का’ लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने बीड जिल्ह्य कार्यकारिणी बरखास्त केली. वाल्मिक कराडला आता पुढचे किमान सहा महिने तरी जामीन मिळणार नसल्याने परळीच्या राखेतील मायाजालाला सुरुंग लागला आहे.महाराष्ट्र राज्यातील बीड हा दुष्काळी टापूतील आणि तीन/चार राज्यांना ऊसतोडणी मजूर पुरवणारा जिल्हा. वंजारी समाजाचे बहुतांश लोक गरीब; परंतु त्यांचे नेते आणि मुकादम मात्र धनदांडगे. ऊसतोडणी मजुरांचे हे देव कधी दानव झाले, हे त्यांनाही कळले नाही. या जिल्ह्यातील मराठा आणि वंजारी समाज एकमेकांना जपत होते; परंतु मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या दोन समाजांत दरी निर्माण होत गेली. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मराठा समाज पेटून उठून रस्त्यावर आला नसता आणि सर्वपक्षीय, तसेच सर्व समाजातील नेत्यांनी आवाज उठवला नसता, तर खरंच राज्य सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता का, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो आणि त्याचे उत्तर नकारार्थी असते. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोन्याची एक कथा आहे. तिथे जगण्यासाठी मृताच्या राखेतील सोने नदीतून जमा करणाऱ्या काहींचा संघर्ष चित्रीत करण्यात आला आहे. आता बीड जिल्ह्यातील परळीतील राखेतून सोन्याचे इमले बांधणारे गुंडाचे मायाजाल चर्चेत आले आहेत. गुन्हेगारांना जात नसते, धर्म नसतो, असे म्हटले जाते; परंतु गुन्हे दाखल झालेल्यांचे समर्थन करण्यासाठी बीड जिल्ह्याला वेठीला धरले जाण्याचा प्रकार गेली दोन दिवस दिसतो आहे. खोटे गुन्हे दाखल असल्याचे कारण दिले जात आहे.सतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंत हे गुन्हे खोटे होते, असा साक्षात्कार कुणालाच झाला नाही हा भाग वेगळा. हत्या झाल्यानंतर राज्याच्या विधिमंडळात आवाज उठल्यानंतरही राज्य सरकारने ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले, ते पाहता संशय घेण्याइतकी जागा होती. वारंवार आंदोलने, मागण्या झाल्यानंतर तीन प्रकारच्या चौकशा जाहीर झाल्या. संशय़ित आरोपींच्या गळ्यात गळे घालणारेच जेव्हा विशेष पथकात होते, तेव्हा त्यावर पुन्हा आवाज उठवावा लागला. त्यांची छायाचित्रे समाज माध्यमातून प्रसिद्ध झाली. तेव्हा कुठे सरकारला जाग आली आणि विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांची नावे बदलली, तर आता ज्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आहे, ते बसवराज तेली हे आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय आहेत, असा आरोप खंडणी आणि हत्येतील संशयित वाल्मिक कराड यांच्या पत्नीने केला आहे. यापूर्वीच्या पोलिस यंत्रणेने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनून काम केल्याने विविध तपास पथकांना बीड जिल्ह्यामध्ये मध्ये काम करणे कसे अवघड आहे, हे यंत्रणांवर आता होत असलेल्या आरोपातून दिसते. बीड जिल्ह्याच्या माजी जिल्हा पोलिस प्रमुखांनी तेथील गुन्हेगारी आणि राजकारण्यांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणारा अहवाल देऊनही सर्वपक्षीय सरकारने आतापर्यंत कारवाई न केल्यानेच बीड जिल्ह्यामध्ये हत्या, खंडणी, अपहरण असे प्रकार वाढत गेले आणि बीड जिल्ह्याची तुलना बिहारशी होऊ लागली.एकीकडे गुन्हेगारांना जात नसते असे म्हणायचे आणि दुसरीकडे गुन्हे दाखल असलेल्यांच्या समर्थनार्थ बंद, तोडफोड, जाळपोळ करायची ही बीडची नवी नीती यंत्रणांच्या लक्षात आली होती; परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. वाल्मिक कराडला ‘मोक्का’ लावण्याचे संकेत मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यात एक दिवस अगोदरच जमावबंदी लागू आदेश करूनही प्रत्यक्षात ‘मोक्का’ लागल्यानंतर बीड जिल्ह्यात तणाव निर्माण झाला. गुन्हे नावावर असणाऱ्यांना पिस्तूल परवाने, गुन्हे दाखल असलेले शासकीय समित्यांचे प्रमुख, खंडणीसाठी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे गुंड आणि त्यांना राजकीय आशीर्वाद देणारे; किंबहुना त्यांच्या या मायाजालात भागीदारी करणारे राजकारणी, कळ्यांना उमलण्याअगोदर नख लावणारे सामान्य, त्यांना साथ देणारे पैशाच्या मोहापायी पेशा विसरणारे डॉक्टर, राखेतून सोने कमवणाऱ्या टोळ्या, असे गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे वातावरण तयार झाले असताना बीड, परळीला बदनाम का करता, असे सवाल विचारले जात असतील, तर कोण कुणाला बदनाम करत आहे. यांचे पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करायला हव. समर्थन करण्यालाही काही मर्यादा असतात. गुन्हेगारी वृत्ती आणि त्यांची कर्मकांडे लागेबांधे उघडकीस आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीला दिवसाला सात/आठशे अश्लील मेसेज आणि धमक्या पाठविणाऱ्या समर्थकांची आणि त्यांच्या नेत्यांची मानसिकताही लक्षात यायला हवी. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गांवचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना सरपंचाला अनंत यातना करुन हत्या केली आणि तो विव्हळताना त्याचा असुरी आनंद घेणारी ही वृत्ती राज्याच्याच नाही, तर संबंध देशासमोर आली. बीड जिल्ह्यातील खंडणी, दहशत, टोळ्यांचे मायाजाल समोर आले. पीकविमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणे एकामागून एक समोर येऊ लागली. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस येऊनही सत्ताधारी मंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याने कुणीच काही दखल घेत नव्हते. महाभारतात जशी शंभर अपराध होण्याची वाट पाहिली गेली, तशीच वाट वाल्मिक कराड टोळीच्या बाबतीतही राज्य सरकार पाहत होते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पुरावा नव्हता, असा युक्तीवाद केला जाईल; परंतु पूर्वीचे गुन्हे दाखल होते, तेव्हा काय केले, हा प्रश्न पडतोच. पोलिसांना भीती वाटावी इतकी दहशत या पट्ट्यात आहे. दहशत, खंडणीचा परळी पॅटर्न देशात बदनाम झाला. अनेकांचे मुडदे पाडल्याचा, जमिनी बळकावल्याचा, इतरांच्या नावे संपत्तीचा, मालमत्तांचा डोलारा उभे केल्याचे दित असताना प्रशासकीय यंत्रणा डोळे झाकून मुग गिळून गप्प राहिल्या. राजकीय विरोधकांना धडा शिकवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ‘ईडी’, प्राप्तिकर खाते, ‘सीबीआय’सारख्या यंत्रणांचा वापर केला जात असताना सर्वपक्षीय नेत्यांशी जुळवून घेणाऱ्या गुंडाच्या वेळी या सर्व यंत्रणा डोळे मिटून गप्प का बसतात, हे कोडे उलगडत नाही. बीड जिल्ह्यातील अशा अनेक ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ धुमाकूळ घालीत असताना प्रशासकीय यंत्रणा त्यांना मिळणाऱ्या वाट्यावर समाधान मानीत राहिल्या. त्यांचे आणि टोळ्यांचे नातेसंबंध सामान्यांच्या मात्र मुळावर उठले होते.परळीमध्ये कोळशापासून औष्णिक ऊर्जा निर्मिती सुरू झाली. या जळालेल्या कोळशामधून सुकी आणि ओली राख बाहेर येते. ही राख प्रदूषण करते. जमीन नापीक करते अशी ओरड या औष्णिक विद्यूत केंद्राजवळील गावातून होत होती. अर्थात याविरोधात अजूनही काही गावातील नागरिक आंदोलन करतात दिसतात. २०१० नंतर परिस्थिती बदलली. ही राख बांधकामांमध्ये, वीट भट्ट्यांसाठी वापरली जाऊ लागली आणि अर्थकारण बदलले. या राखेवर माफियांची नजर पडली आणि पुढे या अर्थकारणाने खंडणी माफियांना, राजकीय गुन्हेगारीला बळ दिले. त्यातून उन्माद सुरू झाला. औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, पोलिस, महसूल आणि राजकीय नेत्यांची ‘सोनेरी टोळी’तयार झाली. अनेक गावातील तरुण या व्यवसायात उतरले. वर्चस्वातून त्यांच्यात मारामाऱ्या, गोळीबार, खंडणी हे त्यांचे धंदे. या सर्वांत आका तयार झाले. वाल्मिक कराड त्यातील एक. बीड जिल्ह्यातील आर्थिक नाड्या त्याच्या हातात आहेत. बदलीपासून ते निधी वाटपापर्यंत सर्वांवर त्याची पकड. या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून प्रति दिन जवळपास सहाशे ते सातशे ट्रक राख गोळा करण्यात येते. एका ट्रकमागे सरासरी वीस हजार रुपयांची कमाई होते. दिवसाला कमाईचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचतो. वर्षाला साधारणत १०/१५ हजार कोटींच्या घरात राख विक्रीतून माया जमा होते. निविदा कुणालाही मिळाली, तरी वाल्मिक कराडची माणसे सगळा व्यवहार पहातात, असा आरोप आहे. कोणी याविरोधात आवाज उठवला, तर तो बंद करण्याची सर्व जबाबदारी ‘या गँग्स ऑफ वासेपूर’कडे आहे. त्यांचा आका सर्व मॅनेज करत असल्याने या तरुणांना कोणतीही चिंता नसते. औष्णिक विद्युत केंद्र आणि राखेच्या काळ्या धंद्याव्यतिरिक्त, आता बीड जिल्ह्यात येऊ घातलेल्या विविध विकास प्रकल्पात आपला हप्ता ठरवण्यासाठी ही टोळी सरसावली असते. पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी मारहाण, अपहरण असे बरेच कारनामे करत असतानाच त्यांनी मस्साजोग गांवचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात सुरुवातीपासून स्थानिक पोलिस, ‘एसआयटी’ इतकेच काय ‘सीआयडी’सुद्धा कारवाई करताना कचरत असल्याचे दिसले. त्यांच्या दहशतीचे आकडे दरदरून घाम फोडणारे आहेत. यातील अनेक शेकडो प्रकरणे दाबली गेली आहेत. अनेकांना वाचा फुटलेली नाही. अनेक जण अजूनही दहशतीत आहेत. मागील वर्षात या जिल्ह्यात ३६ जणांची हत्या करण्यात आली आहे, तर १६८ जणांवर हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील अनेक प्रकरणांना या टोळींच्या दहशतीची किनार आहे. बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना तर बीड जिल्ह्याला लाजवणाऱ्या आहेत. गेल्या वर्षभरात या जिल्ह्यात १५६ महिलांवर बलात्कार झाले. तर ३८६ विनयभंगाच्या घटना नोंद आहेत. तक्रार करण्यास धजावले नाहीत, अशांची आकडेवारी तर किती असेल हे दहशत संपल्यावरच समोर येईल. असे असताना बीड, परळीची बदनामी केली जात असल्याच्या तक्रारीला काय म्हणावे, असा प्रश्न पडतो. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड, परळीतील अवैध धंद्यांना लगाम घातला गेले असे नाही. आता मात्र एक आका आत गेला असला, तरी अन्य आकांचा जोपर्यंत बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत राखेतील मायाजालाला तडा जाऊ शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here