
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या शांत झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे. येत्या गुरुवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे ही नेतेमंडळी जिल्ह्यात येत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना व्हाइट आर्मीच्या वतीने येत्या गुरुवारी दि २३ जानेवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी शरद पवार गुरुवारी कोल्हापुरात येणार आहेत. त्यादिवशी त्यांचा कोल्हापुरात मुक्काम असून, शुक्रवारी ते सांगलीला रवाना हाेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येत्या शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे ता. राधानगरी येथून राज्यातील आभार दौऱ्याची सुरुवात त्यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी ता. हातकणंगले येथील पंचकल्याण महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत राहणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी दि. २४ सकाळी ११ वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. न्यू पॅलेसच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय मंडलिक,खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.