कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर..

0
77

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा जामीन मंजूर केला. त्यामुळे या हत्या प्रकरणातील सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या पाच आरोपींना २०१८ ते २०१९ दरम्यान अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून ते तुरूंगात होते. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरूंगातच आहेत. त्यांनी वेळोवेळी जामीनासाठी अर्ज केले होते. पण त्यांना जामीन मिळाला नव्हता. आता मात्र हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. याशिवाय काही निरिक्षणही कोर्टाने या निमित्ताने नोंदवले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास ही धीम्या गतीने सुरू आहे. त्यात लक्षणीय प्रगती झालेली दिसत नाही. त्यामुळेच आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. त्याच बरोबर न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांनी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र पाच आरोपींच्या जामीनाचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. क्रामेड गोविंद पानसरे आपल्या कोल्हापूर येथील घरातून पत्नीसह सकाळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले होते. ती तारीख होती १६ फेब्रुवारी २०१५ ची. त्याच वेळी दुचाकीवरून हल्लेखोर आले होते. त्यात दोघांचा समावेश होता. या दोघांनी अतिशय जवळून पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले होते. पण चार दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला याचा तपास कोल्हापूर पोलीस करत होते. त्यानंतर तो सीआयडीकडे आणि पुढे एसआयटीकडे वर्ग करण्यात आला होता. पण अपेक्षीत यश मिळालं नाही. पुढे ही केस दहशतवादी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here