म्हातोबा टेकडीवरील झाडे जगविण्यात यश*नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आनंद व्यक्त

0
55

पुणे प्रतिनिधी: कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर लावलेल्या झाडांना आग लावून नष्ट करण्याचा प्रकार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाला होता. या प्रकारामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील कमालीचे संतप्त झाले होते. आता ही झाडे वाचविण्यात चंद्रकांतदादा पाटील यांच्या टीमला यश असून, त्यासाठी अनेक हातांच्या कष्टाचे चीज झाले असल्याची भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. वृक्ष संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या १० जून २०२४ रोजी ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्यानुसार कोथरूड येथील, महात्मा, म्हातोबा, पाषाण भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड करण्यात आली होती. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावण्यात आले. त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबीची व्यवस्था करण्यात आल्या. तसेच, त्यांच्या देखरेखीसाठी सात जणांची नेमणूक केली होती.मात्र काही टवाळखोरांनी आग लावून ही झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या आगीची २५०० झाडांना झळ बसली होती. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील कमालीचे संतप्त झाले होते. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन टवाळखोरांवर चाप बसविण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे झळ बसलेल्या झाडांना जगविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन काम देखील सुरु केले. त्यासाठी आठ जणांच्या टीमची नेमणूक केली होती. वनविभाग आणि टेकडीवर येणारे सामान्य कोथरुडकर यांच्या मदतीने अथक प्रयत्न केले. त्यामुळे या झाडांना पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. त्यामुळे ही झाडे जगाविण्यासाठी केलेल्या कष्टाचे चीज झाल्यामुळे एक वेगळाच आनंद होत असल्याची भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here