महिलांनो, व्यावसायिक मानसिकता सिद्ध करा – भारतीताई चव्हाण

0
231

प्रतिनिधी मेघा पाटील

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रोत कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास समितीच्या वतीने रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी महिला मेळावा तथा महिला स्वयं रोजगार अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पिंपरी चिंचवड येथील मानिनी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मा. ॲड. श्रीमती भारतीताई चव्हाण या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या उपायुक्त मा. सुवर्णा पवार- खंडागळे या होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. बी वाय यादव, उपाध्यक्ष मा. श्री. नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी मा. श्री. पी टी पाटील, सहसचिव मा. श्री. ए पी देबडवार, खजिनदार तथा सांस्कृतिक प्रमुख मा. श्री. जयकुमार(बापू) शितोळे,मा. श्री. राजेंद्र पवार, डॉ. सौ. मीराताई यादव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ॲड. श्रीमती भारतीताई चव्हाण यांनी मानिनी फौंडेशन ची सविस्तर माहिती दिली. महिलांशी मानिनी संवाद साधला.

महिलांनी आपल्या समस्या व व्यथा मांडल्या.महिलांना स्वातंत्र्याची व सक्षमतेची प्रचिती आली. निर्भयपणे महिलांनी आपले प्रश्न उपस्थित केले. भारतीताई म्हणाल्या,” मानिनी म्हणजे स्वाभिमानी. प्रत्येक महिलेने स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजे. संपूर्ण जगाची निर्मिती महिला करते. तिला जगताना दुसऱ्याच्या आधाराची गरज का वाटावी? केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. यासाठी प्रशिक्षण व मानधन पुरविले जाते. महिलांना दहा ते वीस लाखापर्यंतची कर्जे कोणत्याही तारणाशिवाय दिली जात आहेत.बचत गट महिलांना आर्थिक सक्षमतेची हमी देतात.

पुरस्कार मिळण्याची खंत न बाळगता पुरस्कार प्रदान करा. देण्याच्या भूमिकेत काम करून सक्षमीकरण करा. महाराष्ट्र शासनाने महिलांचे नाव अधिकृत कागदावर लावण्यास परवानगी दिली आहे.उद्योग व व्यवसाय उभे करा.ते चालविण्यासाठी प्रशिक्षण घ्या. संस्थेने कौशल्य विकास केंद्र सुरू करावे.याकामी सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. नेतृत्व, आत्मविश्वास, जिद्द या महिलांमध्ये असतात. त्या जोरावरच त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. नकारात्मक व संकुचित मानसिकता बाजूला ठेवून काम करा. मुली व महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करा. व्यावसायिक मानसिकता सिद्ध करा. नियोजन, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, संघटन याची रुजवणूक करा.महिला ही समाजाची व देशाची शक्ती आहे. या शक्तीला सकारात्मक दिशेने नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.”अध्यक्षीय भाषणात मा. सुवर्णा पवार- खंडागळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “स्वप्न झोपेत पाहू नका. पाहिलेले प्रत्येक स्वप्न साकार होत असतात. श्रम, कर्तृत्व, निष्ठा व विश्वास या जोरावर ही स्वप्ने पूर्ण होतात. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात कर्मवीरांचे योगदान उल्लेखनीय आहे. महिला सुरक्षितता हा चिंतेचा विषय आहे. मुलींबरोबर मुलांवरही संस्कार करा. महिला धोरण व कायदे आहेतच परंतु गरज आहे ती आपल्या मानसिकतेची. कायद्याची माहिती घेऊन अन्याय व अत्याचार दूर करा. स्वतःला बदला. काळाबरोबर चाला. स्वतःला माणूस म्हणून स्वीकारा. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा, बाजारपेठेचे व वस्तू विक्रीचे कौशल्य शिका आणि व्यवसाय सुरू करा असे त्यांनी सांगितले.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या अध्यक्षा प्रा. सौ. एस एस सुरवसे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका श्रीमती कविता धावणे व प्रा. ज्योती यादव यांनी करून दिला.सन्मान पत्राचे वाचन डॉ एल आय राठोड यांनी केले. प्रा. मंजुषा श्रीमंगल यांनी समितीचे अहवाल वाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री शिवाजी महविद्यालयाच्या संगीत विभागाच्या डॉ अबोली सुलाखे व विदयार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. उपस्थितांचे आभार डॉ दैवशाला रसाळ यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहासिनी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेतील सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, प्राचार्य, शाखाप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी, बार्शी व धाराशिव तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here