सर्वाजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते मानक कार्यपद्धती पुस्तिकेचे प्रकाशन..

0
37

प्रतिनिधी मेघा पाटील

यात्रा, जत्रा, उरुस, सामाजिक तसेच इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमधील अन्न विषबाधा टाळण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) जाहीर

कोल्हापूर, दि.०८: राज्यातील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सातत्याने आग्रही असून राज्य व केंद्र शासनाच्या सहयोगातून अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी विभागामार्फत करण्यात येत आहे. मागील काही कालावधीतील अन्न विषबाधेच्या घटना लक्षात घेता राज्यातील नागरिकांना सर्वकष आरोग्य सुविधा प्राप्त व्हाव्यात आणि अशा संभाव्य घटनांना प्रतिबंध करता यावा या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, महसूल विभाग, जिल्हा आपत्ति व्यवस्थापन कक्ष यांनी आरोग्य विभागाच्या समन्वयाने आणि परस्पर सहकार्याने सर्व समावेशक उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी संकल्पना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली होती. या अनुषंगाने पालकमंत्री आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा साथरोग कक्ष व शीघ्र प्रतिसाद पथक यांनी सर्व विभागांसाठी मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे. या मानक कार्यपद्धती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.या मानक कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास आपण अन्नविषबाधेसारख्या घटनांचा प्रतिबंध करु शकू, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि वैयक्तिक व परिसर स्वच्छतेची काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला अन्नविषबाधा आणि इतर संसर्गापासून दूर राहता येईल असे सांगून सुरक्षित अन्न, सुरक्षित आरोग्य, समृद्ध कोल्हापूर” हे उद्दीष्ट ठेवूया असे ते यावेळी म्हणाले. यावेळी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे उपस्थित होते.जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अन्न सुरक्षा हा आजच्या घडीला महत्त्वाचा विषय असून, अन्त्र विषबाधेच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर “अन्न विषबाधा प्रतिबंध आणि जनजागृती अभियान” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी यावेळी आम्ही “अन्न विषबाधा प्रतिबंध आणि जनजागृती” हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवत आहोत असे सांगून आजच्या घडीला बदलते जीवनशैली, फास्ट फूड संस्कृती आणि अन्न प्रक्रियेमधील दुर्लक्ष यामुळे अन्न विषबाधेच्या घटना वाढत आहेत. हे लक्षात घेता, सुरक्षित अन्न साखळी, स्वच्छता नियमांचे पालन, अन्न परीक्षण आणि जनजागृती या चार स्तंभांवर आधारित हा उपक्रम आखण्यात आला असल्याचे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक, अन्न विक्रेते, शालेय संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचे सहकार्य आवश्यक आहे. आरोग्यदायी कोल्हापूर हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here