कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : ओळखीतील महिलेनेच भीक मागण्यासाठी कनाननगरातील दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी (दि. २७) दुपारपासून मुले आणि संशयित महिला गायब आहे.
याबाबत अपहृत मुलाच्या नातेवाईकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मिरज आणि गोव्यात मुलांचा शोध सुरू आहे.
रुपाली नितीन खाडे (वय ११) आणि भीमा मोहन कुचकोरवी (वय १२, दोघे रा. कनाननगर, कोल्हापूर) अशी अपहृत मुलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात स्टेशन रोडवर भीक मागून उदरनिर्वाह करणारी एक महिला कनाननगरात राहत होती. अधूनमधून ती कनाननगरातील काही मुलांना सोबत घेऊन भीक मागण्यासाठी जात होती.
रविवारी दुपारी महावीर गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेलेले भीमा आणि रुपाली यांना घेऊन ती निघून गेली. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शहरात मुलांचा शोध सुरू केला. मात्र मुलांसह संशयित महिलेचाही काहीच सुगावा मिळाला नाही. यांच्या शोधासाठी एक पथक मिरज येथे, तर दुसरे पथक गोव्याला गेले आहे.
शहरातही एका पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन दिवस शोध घेऊनही मुले सापडत नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली आहे.