
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व शिवभक्तांना एक आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी शिवजयंती उत्सव साजरा करताना त्यामागची प्रेरणा आणि उद्देश स्पष्ट केला आहे. डॉल्बीच्या तालावर अंगविक्षेप आणि मद्यपान करून नाचणे यामुळे आपण आपल्याच प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा अनादर करण्यासारखे आहे. आपल्या पूर्वजांनी सण-उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती. तीच काळजी आज आपण सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी यामध्ये म्हटले आहे. याशिवाय, फ्लेक्समुळे होणारे शहराचे वाढते विद्रुपीकरण हा देखील चिंतेचा विषय आहे. फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच, पण अनेक चुकीच्या पद्धतीने फ्लेक्स लावल्यामुळे वाहतूकीलाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, हेही थांबवणे आवश्यक असल्याचे आवाहन पाटील यांनी या पत्रात केले आहे. शिवजयंतीच्या उत्सवाचे गांभीर्य आणि पावित्र्य टिकवणे आपले कर्तव्य असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे कि, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज है आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी तरुण पिढीला एकर आणण्यासाठी आणि शिवरायांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी शिवजयंती उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास सुरुवात केली. त्या काळात शंखनाद, सनई-चौथडे, लेझीम, ढोल यांसारख्या पारंपरिक आणि मंगलमय कद्यांसह शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कर्तृत्व कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, शाहिरांचे पोवाडे, शिवचरित्रावर आधारित नाट्यकलाकृती यांसारख्या कार्यक्रमातून पोचवले जात असे. शिवजयंती उत्सवाचा मूळ उद्देश कुठेतरी हरवत आहे की काय, असे माझ्यासारख्या अनेक शिवभक्तांना वाटते. त्यामुळे, शिवजयंती उत्सव साजरा करताना त्यामागची प्रेरणा आणि उद्देश आपण विसरता कामा नयेत, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.
आपणा सर्वांना माहीत आहेच की डॉल्बीसारख्या उपकरणांमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. डॉल्बी आणि लेड़झार शोमुळे अनेकांना बहिरेपणा आणि डोळ्यांना गंभीर इजा झाल्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिला यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याने, तज्ज्ञ डॉक्टरांकडून डॉल्बी आणि लेझरपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. यासोबतच, अतिरिक्त ध्वनी प्रदूषणामुळे अनेक पशू-पक्ष्यांवरही प्रतिकूल परिणाम होतात. डॉल्बीच्या तालावर अंगविक्षेप आणि मद्यपान करून नाचणे यामुळे आपण आपल्याच प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा अनादर करीत आहोत, हेही अनेकांच्या लक्षात येत नाही.
शिवछत्रपतींचा आदर करणे आणि त्यांचे प्रेरक जीवन अंगी बाणवण्यासाठी वेळीच योग्य पावले उचलली पाहीजे. डॉल्बीला विरोध करणे हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा भाग आहे. आपल्या पूर्वजांनी सण-उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती. तीच काळजी आज आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. आपले पुणे शहर सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. देश-विदेशातील अनेक लोक उत्सव काळात येथे येतात, त्यांना आपल्या उत्सवाचे सौंदर्य अनुभवू द्या. शिवजयंतीच्या उत्सवाचे गांभीर्य आणि पावित्र्य टिकवणे आपले कर्तव्य आहे.
गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, हे सण मोठ्या उत्साहाने स्वजरे करता यावेत यासाठी माझी नेहमीच मदत करण्याची भूमिका असते, मात्र हे सण सवंगपणे साजरे होताना पाहणे माझ्यासारख्या शिवभक्त कार्यकर्त्याला वेदना देते. आपण सर्वांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे ठरवल्यास, त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची माझी कायमच तयारी आहे.
याशिवाय, फ्लेक्समुळे होणारे शहराचे वाढते विद्रुपीकरण हा देखील चिंतेचा विषय आहे. फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच, पण अनेक चुकीच्या पद्धतीने फ्लेक्स लावल्यामुळे वाहतूकीलाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, हेही थांबवणे आवश्यक आहे. मंडळानी फ्लेक्सऐवजी होर्डिंग्जला प्राधान्य दिल्यास, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही या निमित्ताने पाटील यांनी दिली.