शाहूवाडी येथे उपनिबंधक कार्यालयासाठी १.८३ कोटींचा निधी; आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
शाहूवाडी, दि. २९ जुलै २०२५ –
शाहूवाडी तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेत उपनिबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी १ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नव्या इमारतीचे भूमिपूजन आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड (सरकार), कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड, तसेच जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील व पै. विजय बोरगे यांची उपस्थिती लाभली.

प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा मृद्रांक अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, शाहूवाडी – पन्हाळा प्रांताधिकारी समिर शिंगटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, उपअभियंता पूजा शेळके, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार आणि नायब तहसीलदार गणेश लव्हे हे मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नागरिकांना उपनिबंधक कार्यालयाच्या सेवा स्थानिक पातळीवरच अधिक सुलभपणे आणि सुस्थितीत मिळणार असून, वेळ आणि खर्च वाचणार आहे. नव्या इमारतीमुळे कार्यालयीन कामकाजाचा दर्जा उंचावेल आणि नागरिकांसाठी सोयी-सुविधा वाढतील, असे प्रतिपादन या वेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला शाहूवाडी परिसरातील विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.