प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): आज दुपारी १.१० वाजता वारणा डावा कालवा कि.मी. १२ मधील सा.क्र. ११/२०० मी. करुंगली-गुंडगेवाडी ता. शिराळा जि. सांगली येथील गावपुल वारणा डावा कालव्याचा मधला पिअर ढासळून गाव पुल पडला आहे. सद्या प्रतिबंधांत्मक कार्यवाही म्हणून गाव पुलाच्या दोन्ही बाजूस जेसीबी व डंपरच्या सहाय्याने माती व मुरुमाचा ढिगारा टाकून बॅरीकेटस लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे या पुलावरुन वाहतुक करु नये व जलसंपदा विभागास सहकार्य करावे. असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या उप कार्यकारी अभियंता आरती बारटके यांनी केले आहे.

वारणा डावा कालवा कि.मी. १२ मधील सा.क्र. ११/२०० मीटर करुंगली-गुंडगेवाडी, ता.शिराळा, जि. सांगली येथील गावपुल सन १९८५ मध्ये दगडी बांधकामात बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम जीर्ण झाल्याने पुलाचा दगडी पिअर ढिसूळ झालेला होता. त्यामुळे या गाव पुलावरील वाहतुक तातडीने बंद करण्यात आली होती. तसेच याबाबत दक्षता घेण्याबाबत ग्रामपंचायत करुंगली व गुंडगेवाडी यांना सुचित करण्यात आले होते. वाहतूक न करण्याचे व धोकादायक असल्याचे फलक पुलाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आले होते. हा पुल करुंगली-गुंडगेवाडी या दोन गांवाना जोडणारा महत्वाचा पुल असल्यामुळे या पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.