प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहक तक्रारींचे वेळेवर निराकरण करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी दुपारी 2 वाजता उपनियंत्रक वैध मापन शास्त्र, कोल्हापूर जिल्हा यांचे कार्यालय (1875 सी, वॉर्ड, हत्तीमहल रोड, मटन मार्केट शेजारी, कोल्हापूर-416 002) येथे जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. वैधमापन शास्त्र अधिनियम व वैधमापन शास्त्र आवेष्टीत वस्तू कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जनता व ग्राहक यांच्या तक्रारी असल्यास त्या या ठिकाणी मांडता येणार आहेत. यंत्रणेच्या कामकाजाविषयी व वजने मापे संदर्भात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रारी असल्यास त्यासह संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक द.प्र.पवार यांनी केले आहे.
या जनता दरबारमध्ये माहितीचा प्रचार व जनजागृती, हितधारकांचा सहभाग, तक्रारींची नोंद व कार्यवाही अशा विविध गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सामान्य ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तूंचे उत्पादक, पॅकर, आयातदार, किरकोळ विक्रेते व व्यापारी, वजन व मापे परवानाधारक उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांनी उपस्थित राहून यंत्रणेच्या कामकाजाविषयी आपल्या सुचना, अभिप्राय द्यावेत, असे आवाहनही श्री. पवार यांनी पत्रकाव्दारे केले आहे.