
*कोल्हापूरचा गौरवशाली क्षण : हाजी अब्दुल मिर्शिकारी यांना ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड – २०२५’*

एस पी नाईन प्रतिनिधी रोहित डवरी
प्रतिनिधी : कोल्हापूरचे प्रसिद्ध समाजसेवक, यशस्वी उद्योजक आणि राष्ट्रीय रायफल शूटर म्हणून देशभरात ओळखले जाणारे हाजी अब्दुल मिर्शिकारी (लालू) यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड – २०२५ ने गौरविण्यात आले आहे. पुण्यात झालेल्या भव्य सोहळ्यात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कोल्हापूरचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर अधिकच उज्ज्वल झाला आहे.हाजी अब्दुल मिरशिकारी हे गेली अनेक वर्षे समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी जोडले गेले आहेत. सामाजिक कार्यासोबतच त्यांनी व्यवसाय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही, विशेषतः राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये, त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या तिहेरी योगदानामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान आहे.समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, शिक्षण आणि क्रीडेला प्रोत्साहन देणे तसेच युवकांना स्वावलंबनाकडे प्रवृत्त करणे या त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक झाले आहे. याच सकारात्मक कार्याचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा सन्मान म्हणून त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.सन्मान स्वीकारल्यानंतर आपले विचार मांडताना हाजी मिर्शिकारी यांनी भावूक होत सांगितले :“हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण आहे. पण हा सन्मान फक्त माझा नसून संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेचा आहे. समाजाची सेवा करणे, तरुणांना प्रेरणा देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि क्रीडा क्षेत्रात आपले शहर व देशाचे नाव उज्ज्वल करणे हेच माझे ध्येय आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाच्या बळावर मी नेहमी समाजासाठी कार्यरत राहीन. या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदाऱ्यांत आणखी वाढ झाली आहे.”हाजी अब्दुल मिर्शिकारी यांच्या या सन्मानामुळे कोल्हापूरच्या नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. अनेकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. समाजसेवा, व्यवसाय व क्रीडा या तिन्ही क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाला मिळालेला हा बहुमान कोल्हापूरसाठी अभिमानाचा ठेवा ठरला आहे.


