
प्रतिनिधी जानवी घोगळे
कुस्तीच्या परंपरेला उजाळा देत भैरवनाथ तालीम आळवे येथील मल्लकुमारी ऋणल अरविंद जाधव हिने आपल्या चमकदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वारणानगर येथील शास्त्री भवन मैदानावर नुकत्याच झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर तिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऋणल ही नेहरू विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी असून, तिला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. तिच्या या यशामागे शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबियांचे पाठबळ तसेच भैरवनाथ तालीम आळवेचे कुस्ती वस्ताद आदिनाथ बंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे ऋणलने दमदार खेळ सादर करत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
या यशाबद्दल शाळा परिसरात, गावात व तालिम मंडळात आनंदाचे वातावरण आहे. विविध मान्यवर, ग्रामस्थ व तिच्या मित्र-मैत्रिणींनी ऋणलचे मनापासून अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतही तिने उत्तम कामगिरी करावी, अशी शुभेच्छा दिल्या आहेत.
या निमित्ताने ऋणल जाधव हिचे यश हे केवळ तिच्या मेहनतीचे नव्हे तर गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाचे आणि शाळेतील शिक्षक स्टाफच्या प्रोत्साहनाचेही फलित असल्याचे सर्वांनी गौरवले.