

स्वप्निल गोरंबेकर कागल
सांगलीकरांची ताराबाईच्या सन्मानार्थ दिला साहित्य – मैफीलतृप्तीचा आनंद!*- राजा माने राष्ट्रीय पातळीवर एखाद्या क्षेत्रात अतुल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व हे त्या गावाचे केवळ भूषण नसते तर ती त्या गावाची संपत्ती असते.सांगली जिल्हा तर अशा व्यक्तिमत्त्वाच्या हिऱ्यांची खाणच !त्याच संपत्तीच्या वैभवाची अनुभूती मागील आठवड्यात आली.साधी राहणी,प्रत्येक शब्दात आपलेपणा ओसंडून वाहत ठेवणारी निर्मळ वक्तृत्वशैली आणि आपल्या थेट विचारांनी अखिल भारतीय शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ऐतिहासिक बनवून दिल्ली गाजविणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांचा नागरी सत्कार आयोजिला होता.योगायोगाने माझे मित्र प्रा.पद्माकर जगदाळे, त्यांच्या पत्नी व लेखिका प्रतिभा जगदाळे आणि सोहळ्याच्या यजमानांपैकी एक माझे मित्र कवी महेश कराडकर यांच्या मुळे या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला व माझी पत्नी सौ. मंदाला मिळाली.या नेटक्या आणि अप्रतिम सोहळ्याची उंची प्रत्येक वक्त्याने उंचावत ठेवली.माझे मित्र प्रा. अविनाश सप्रे असो,संयोजक चौगुले असो,की कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी अशोक काकडे असोत प्रत्येकाने उत्तम भाषण केले.७ जून १९६७ रोजी सांगलीत पहिले पाऊल राजवाड्यात कसे पडले इथं पासून जीवनात आलेल्या प्रत्येक वळणावर काय घडले, हे ताराबाईंनी मनमोकळेपणाने त्यांच्या शैलीत सांगितला.त्यांच्याच “नाबाद ८७”या कार्यक्रमात त्यांच्या मिश्कीलपणाची साक्ष मिळत होती.तंजावर संस्थानशी असलेल्या त्यांच्या आठवणींना उजळा देताना दक्षिण भारतात मराठी भाषा संस्थानने मराठी भाषा कशी जतन केली याचे “उदंड” किस्से त्यांनी सांगितले.या बहारदार मैफिलीच्या कोंदणात हिरा बसविण्याची कामगिरी साहित्यिक,विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केली.राणी ताराराणी आणि ताराबाईंच्या पराक्रमाची तुलना केली.त्याहून महत्त्वाचे म्हणजे ताराबाईच्या साहित्य सेवा प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या “मधुशाला” या काव्य संग्रहाचा ताराबाईंनी केलेला अनुवाद या बद्दल बोलताना “१९३५ नंतर उत्तर भारताला हरिवंशराय यांच्या”मधुशाला ” प्रेम करायला शिकविले”, हे भाष्य उपस्थिताना विशेष भावले. ताराबाईची साहित्या सेवा आणि “मधुशाला” चे जीवन तत्त्वज्ञान यांची अप्रतिम मांडणी त्यांनी केली.”मधुशाला ” प्रत्यक्ष मद्य किंवा दारूच्या ठिकाणाविषयी नाही, तर ती जीवन, तत्त्वज्ञान, आणि मानवी अनुभूतीचे प्रतीकात्मक चित्रण करते.“मदिरा” म्हणजे जीवनाचे आनंद, प्रेरणा, आत्मिक अनुभूती.“साकी” म्हणजे गुरु, प्रेमिका किंवा देव, जो जीवनाचे सौंदर्य दाखवतो.“प्याला” म्हणजे हृदय किंवा मन, जे अनुभव घेते.आणि “मधुशाला” म्हणजे हे संपूर्ण जग — जीवनाची रंगलेली मैफील!.*“मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला**प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला,**प्रथम तुम्हें अर्पित है मैंने मदिरालय का प्याला,**फिर सबको मदहोश कर दे ऐसी मेरी मधुशाला॥*आदरणीय डॉ. ताराबाईं भवाळकर यांना कोटी कोटी शुभेच्छा. त्यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो, ही प्रार्थना!*राजा माने,*संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक. अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई. सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन. अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.