
कुंभोज : प्रतिनिधी – रोहित डवरी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा ठरत आहे. यंदा या मतदारसंघाचे आरक्षण सर्वसाधारण महिला वर्गासाठी घोषित झाल्याने, अनेक महिला नेत्यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरु केली आहे.
या पार्श्वभूमीवर, हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्य सौ. ऐश्वर्या अजय पाटील या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ऐश्वर्या पाटील यांचा राजकीय प्रवास अनुभवसंपन्न असून त्यांनी पूर्वी लाटवडे–खोची पंचायत समिती मतदारसंघातून यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या पती अजय पाटील यांनीदेखील त्याच मतदारसंघातून दोन वेळा विजयी होत स्थानिक विकासाच्या आघाडीवर आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे पाटील दांपत्यांचा जनसंपर्क, लोकांमधील आत्मीयता आणि मजबूत संघटनशक्ती ही त्यांच्या उमेदवारीची मोठी ताकद मानली जाते.
सध्या ऐश्वर्या पाटील या मतदारसंघातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि महिला स्वावलंबन उपक्रमांमध्ये सक्रीय असून, जनसंपर्क मोहिमेला प्रारंभ केला आहे. त्यांच्या या सक्रियतेमुळे स्थानिक महिला वर्गासह तरुण मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुभवी नेतृत्व, मजबूत कार्यकर्ते, आणि जनतेतील आपलेपणा या त्रिसूत्रीवर ऐश्वर्या पाटील निवडणुकीत उतरण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.
“महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकास ही आमची प्राथमिकता असेल,” असे सौ. ऐश्वर्या पाटील यांनी बोलताना सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.
यामुळे येत्या काही दिवसांत कुंभोज परिसरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, ऐश्वर्या पाटील यांच्या उमेदवारीच्या अधिकृत घोषणेची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

