प्रतिनिधी :जानवी घोगळे
- 29 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत
मुंबई दि. 28 : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षीय मुलाला कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. या संकटाच्या काळात वडीलांनी मुलाला स्टेम सेल्स दान करून त्याचे प्राण वाचवले. तर यासंदर्भात आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतल्याने उपचार शक्य झाले.
प्रकाश (नाव बदलले आहे) हा नऊ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि 12 वर्षीय मोठ्या बहिणीसोबत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एका गावात राहतो. वडील एका खासगी फायनान्स कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपासून प्रकाश सतत आजारी पडत होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील तपासणीसाठी कल्याण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीतून प्रकाशला कर्करोग असल्याचे निदान झाले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तसेच उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविला. या परिस्थितीत डॉक्टरांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्याचा सल्ला दिला.
प्रकाशच्या पालकांनी पुढील उपचारासाठी मुंबई येथील वाडिया रुग्णालस गाठले. त्यासोबतच आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात धाव घेत, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. श्री नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली. त्यातूनच मुंबई येथील वाडिया रुग्णालयात प्रकाशवर उपचार सुरू करण्यात आले.
विविध स्रोतांतून मदतीचा हात
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून, टाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण 29 लाखांची मदत उभी करण्यात आली. वडिलांच्या अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दानातून आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकाराने गोळा झालेल्या आर्थिक मदतीतून प्रकाशवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आमच्याकडून प्रकाशवर उपचार करणे शक्य वाटत नव्हते, या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशातून आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने मिळालेल्या मदतीमुळेच मुलाचे प्राण वाचले अशी भावनीक प्रतिक्रिया मुलाच्या पालकांनी दिली.
प्रकाश प्रमाणेच समाजातील इतरही अनेक गरीब व गरजू रुग्णांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उपचार होत आहेत. पैशा अभावी कोणाचेही उपचार थांबणार नाहीत, या भूमीकेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष मदतीसाठी तत्पर आहे. रूग्ण व नातेवाईकांनी घाबरून/गोंधळून न जाता जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी किंवा 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष/

