ए.एस ट्रेडर्स फसवणूक : सुभेदारच्या पत्नीकडून ५०लाखाचे दागिने जप्त

0
61

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर – एस. ट्रेडर्स कंपनीचा मुख्य संशयित सुत्रधार लोहीतसिंह सुभेदार याच्या विभक्त पत्नीकडून तपासात आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने व अडीच लाख रूपये किंमतीचे हिऱ्याचे दागिने असा ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ए.एस ट्रेडर्स आणि त्यांच्या सलंग्न उप कंपन्याविरोधात गुंतवणुकदारांकडून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याच्या तपासामध्ये तीन संचालक, तीन एजंट, कंपनीची ॲडमिन, असे एकूण सात आरोपींना अटक केली आहे.

अटक संशयितांकडून फसवणूक केलेली रक्कम व त्यातून खरेदी केलेले सोन्याचे हिऱ्याचे दागिने , दुचाकी, चारचाकी वाहने, शेत जमिनी, प्लॉट, फ्लॅट व बँक खात्यांमध्ये ३ कोटी ३६ लाख रुपये असा साधारण ८ कोटी रूपयांच्या मुद्देमालाचा शोध घेण्यात आला आहे.

संशयित लोहितसिंग याच्यासह एकूण २४ फरार संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान मुख्य संशयित लोहितसिंग यांच्या विभक्त पत्नीकडेही चौकशी सुरु आहे. यात विभक्त पत्नीकडून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी पाऊण किलो सोन्याचे दागिने, अडीच लाख किंमतीची हिऱ्याचे दागिने असा ५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल शनिवारी जप्त केला.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, आर्थिक शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती गायकवाड, अंमलदार राजू वरक, दिनेश उंडाळे, रवि पाटील, दिपक सावत यांनी ही कारवाई केली.

या कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी आर्थिक शाखेची संर्पक साधून तक्रार दाखल करावी. असे आवाहन पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here