कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती

0
51

मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

प्रसिद्धी पत्रकातून मांडली भूमिका

कोल्हापूर, दि. १७:
कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षितपणे युती झाली, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या अनपेक्षित युतीबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिकचे खुलासे केले आहेत.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे, आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो.

तसेच; माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करीन. माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल, याची मला खात्री आहे.

सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरून कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही.

याबाबत; मंगळवार दि. १८ रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत.

दरम्यान; कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती (हीस्ट्री रीपीट्स) झालेली आहे. टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या. कै. शामराव भिवाजी पाटील व कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब, कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब व कै. विक्रमसिंहराजे घाटगे, मी स्वतः व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावरून कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले? हे समजू शकेल. परंतु; यामध्ये “ईडी” ची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला. “देर आये….. दुरुस्त आये…..!”

आता आपली सर्वांची जबाबदारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षसह सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे. त्यासाठी आपण सर्वजण जिवाचे रान करू. बाकी; सर्व पत्रकार परिषदेमध्ये मन मोकळे करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here