विद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे; विद्यापीठाच्या गुणांकन वाढीसाठी टास्क फोर्स स्थापन करावे- राज्यपाल आचार्य देवव्रत.

0
15

एस पी नाईन प्रतिनिधी प्रा मेघा पाटील

मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे. विद्यापीठांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेली अशी टास्क फोर्स स्थापन करून ती दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करेल अशी प्रणाली निर्माण करावी, असे मार्गदर्शन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातील उपस्थितीत विद्यापीठांचे कुलगुरू यांना केले.राजभवन येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) आणि व्हिजन महाराष्ट्र २०४७’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, विद्यापीठे ही विद्या आणि संस्कारांची केंद्रे असावीत. शिक्षक हे विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने जोडले जावे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद व सहकार्य वाढले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल. तसेच खेळ, एनसीसी, एनएसएस यांसारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तंदुरुस्त शरीर आणि सुदृढ मन हेच चांगल्या शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत, असेही यावेळी त्यांनी सांगितले.विद्यापीठांनी रोजगारक्षम अभ्यासक्रम विकसित करावेत जे थेट उद्योगजगताशी निगडित असतील. शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडले गेले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण जितके गुणवत्तापूर्ण, तितकी शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल.

आपल्या प्रशिक्षण केंद्रांचा दर्जा अधिक उंचवण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्ये यांविषयी संवेदनशील केले पाहिजे. विद्यापीठांनी अशा वक्त्यांना आमंत्रित करावे ज्यांच्या विचारांमधून जीवनमूल्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळेल. विद्यार्थ्यांशी संवाद वाढवा, त्यांच्या समस्या जाणून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. आपण ज्या भावनेने काम करू, त्याच भावनेने विद्यार्थी देशाच्या प्रगतीस हातभार लावतील. शासन, शिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी परस्पर सहकार्याने सतत संवाद आणि कृती ठेवली पाहिजे. नियोजन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर काम केल्यास महाराष्ट्र निश्चितच देशातील आदर्श शैक्षणिक राज्य बनेल, असा विश्वासही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला.उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शैक्षणिक धोरणांना संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन दर तीन महिन्यांनी उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत करण्यात येते. या पुढेही आपण अशा कार्यशाळेत ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊन मार्गदर्शन करावे, अशी विनंती राज्यपालांना केली.उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी महाराष्ट्र राज्याला ‘एज्युकेशन हब’ तयार करण्यासाठी ‘विकसित महाराष्ट्र २०४७ — राज्य सार्वजनिक विद्यापीठांची भूमिका निश्चित करणे, या विषयावर आधारित पीपीटीचे सविस्तर सादरीकरण करून राज्यपालांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here