
प्रतिनिधी : जानवी घोगळे
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ५१व्या कोल्हापूर परिक्षेत्र क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्रीडा प्रकारांमधील उत्साहवर्धक स्पर्धांचा सांगता समारंभ दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिस उपमुख्यालय, बारामती येथे उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

या समारोप प्रसंगी अपर पोलीस महासंचालक (दळणवळण, तंत्रज्ञान व मोटर परिवहन) श्री. दीपक पांडे, तसेच पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र श्री. सुनील फुलारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व घटकप्रमुख, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध जिल्ह्यांतील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी व जवानांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. उत्कृष्ट शारीरिक क्षमता, शिस्त आणि क्रीडाभावाची प्रचीती देत विविध प्रकारांच्या स्पर्धा रंगतदार पद्धतीने पार पडल्या.या वर्षीचा सर्वसामान्य जेतेपद सातारा संघाने दिमाखात पटकावले.

सातारा संघाने विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एकूण गुणसंख्येत आघाडी घेत ही मानाची तलवार आपल्या झोळीत टाकली.समारोप प्रसंगी मान्यवरांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करून पोलीस दलात क्रीडा संस्कृती, तंदुरुस्ती आणि मैत्रभाव वाढीस लागण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

क्रीडा स्पर्धांमुळे जवानांमध्ये टीमवर्क, मानसिक बळ आणि शारीरिक क्षमतेत उल्लेखनीय वाढ होते, असेही यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजन पुणे ग्रामीण पोलीस दलाने केले असून सर्व स्पर्धक, अधिकारी, कर्मचारी आणि आयोजकांचे या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक करण्यात आले.







